कोल्हापुरात चार-पाच ऑक्टोबरला रानभाज्या-सेंद्रिय उत्पादन महोत्सव
schedule30 Sep 25 person by visibility 165 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर ह्यांच्यावतीने जवळपास २०० हून अधिक रानभाज्यांचे आणि सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन ४ आणि ५ ऑक्टोंबर २०२५ रोजी साईक्स एक्स्टेंशन परिसरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत आयोजित केले आहे,अशी माहिती एनजीओ कंपेंशन २४ आणि कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी परिषदेत दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन चार ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक यांच्या हस्ते होणार आहे. विभागीय कृषी केंद्र सहसंचालक बसवराज मास्तोळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, शिवाजी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ. ज्योती जाधव, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, ‘हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रवेश विनामूल्य आहे. या प्रदर्शनात अनोख्या रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठेवण्यात येणार असून, महाराष्ट्रात प्रथम १०० हून अधिक रानभाज्या आणि त्यांची रोपे आणि सेंद्रिय गूळ ,मध,भाजीपाला,धान्य, हर्बल औषध,ऑरगॅनिक औषध, कंपोस्ट खत,गांडूळ खत,भाजीपाल्याची डीहायड्रेटेड पावडर, सेंद्रिय भाजीपाला रोपे व बी बियाणे यांच्यासह सेंद्रिय भाजीपाल्यापासून बनवलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असे एकूण ३५ स्टॉल्स प्रदर्शनस्थळी उपलब्ध असतील.
प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे ५ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता प्रदर्शनस्थळी खास महिलांसाठी भरवण्यात येणारी रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ( ग्रामीण व शहरी विभाग ) आणि त्यासोबत रोख पारितोषिक / सर्टिफिकेट जिंकण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी मंजिरी कपडेकर - 9373319495 ऐश्वर्या जामसंडेकर – 7620619495 यांच्याशी संपर्क साधावा. पत्रकार परिषदेस डॉ. दिलीप माळी,पल्लवी कुलकर्णी, मंजिरी कपडेकर , शरद आजगेकर, अनुराधा भोसले, मोहन माने, अभिजित पाटील, सुशांत टक्कळकी, अमृता वासुदेवन, कविता घाटगे, जितेंद्र शाह उपस्थित होते.