सिनेट सदस्याचा पाठपुरावा, विद्यापीठात शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू
schedule30 Sep 25 person by visibility 389 categoryशैक्षणिक

सिनेट सदस्याचा पाठपुरावा, विद्यापीठात शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर ऑनलाइन अभ्यासक्रम
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एखाद्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला, प्रामाणिकपणाने धडपड केली की ते काम मार्गी लागते, प्रशासनालाही दखल घेऊन कार्यवाही करावी लागते याची प्रचिती सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी घडविली. शिवाजी विद्यापीठातर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर ’ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करावा, जेणेकरुन हा अभ्यासक्रम कोणालाही शिकता येईल यासाठी मिठारी हे सातत्याने प्रयत्नशील होते. पहिल्यांदा सिनेटमध्ये ठराव मांडला. त्यानंतर व्यवस्थापन परिषद, विद्या परिषदेत मंजूर व्हावा म्हणून पाठपुरावा केला. अधिकार मंडळाने मान्यता देऊनही प्रशासकीय पातळीवर दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांनी, महात्मा गांधी जयंतीदिनी (दोन ऑक्टोबर २०२५ ) विद्यापीठात सत्याग्रह आंदोलनाचा इशारा दिला. प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेत हा अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी एक ऑक्टोबर ते ३१ऑक्टोबर २०२५ हा कालावधी जाहीर केला आहे.
‘शिवाजी विद्यापीठात, छत्रपती शिवाजी महाराज : जीवन व कार्य’ हा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू होत आहे. हा अभ्यासक्रम सुरू व्हावा म्हणून गेली अडीच-तीन वर्षे सातत्याने प्रयत्न सुरू होते. विद्यापीठ प्रशासनाने ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले. ही आमच्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे. ऑनलाइन अभ्यासक्रमाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. कोणीही कुठूनही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो. शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर अभ्यास करण्याची संधी साऱ्यांना उपलब्ध झाली आहे’अशी भावना सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी व्यक्त केली.
हा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यास विलंब होत असल्याचे निदर्शनास आल्यावर मिठारी यांनी विद्यापीठ प्रशासनाला दोन ऑक्टोबर रोजी विद्यापीठ परिसरात आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले. त्यावर प्रशासनाने, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला आहे, आंदोलन मागे घ्या असे सुचविले. दरम्यान मिठारी यांनी अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधीचे रिसतर पत्र आणि प्रवेशासाठीची जाहिरात प्रसिद्धी पत्र हवे असे कळविले. त्यानुसार प्रशासनने या दोन्ही बाबींची पूर्तता केली.
शिवाजी विद्यापीठ इतिहास विभागातर्फे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये म्हणजे, कोणालाही प्रवेश घेता येईल. दर्जेदार व वैविध्यपूर्ण ई कंटेन्ट, ई बुक्स स्वरुपात संदर्भ साहित्य, ऑनलाइन परीक्षा व स्वाध्याय सुविधा आहे. या ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी प्रवेश फी ५० रुपये आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीचा कालावधी एक ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२५ असा आहे.