अग्निशमन इमारत दुर्घटनेच्या चौकशीसाठी महापालिकेने नेमली समिती
schedule01 Oct 25 person by visibility 69 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : फुलेवाडी अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिकेने चौकशी समिती नेमली आहे. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. चौकशी समितीत अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर यांची नियुक्ती केली आहे.
मंगळवारी (३० सप्टेंबर २०२५) रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास फुलेवाडी अग्निशमन दलाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला. बांधकाम सुरू असताना हा प्रकार घडला. या घटनेत एक कामगार ठार तर सहा जण जखमी झाले. नवनाथण्णा कागलकर (वय ३८ वर्षे, राजारामपुरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेत अक्षय पिराजी लाड, दत्तात्रय सुभाष शेबडे, वनिता बापू गायकवाड, जया सुभाष शेबडे, सुमन सदा वाघमारे जखमी झाले.अग्निशमन दलाच्या जवानांनी व परिसरातील नागरिकांच्या सहकार्यातून ढिगाऱ्यातून जखमींना बाहेर काढले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून मंजूर ५० लाख रुपयेच्या रकमेतून फुलेवाडी फायर स्टेशनच्या दुमजली इमारतीचे काम सुरू होते. मंगळवारी, या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचे स्लॅब टाकण्यात येत होते. काम सुरू असतानाच स्लॅब कोसळला आणि दुर्घना घडली.
या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने समिती नेमली आहे. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘फुलेवाडी अग्निशमन विकास केंद्र विकास व कर्मचारी निवासस्थान इमारतीचा स्लॅब टाकण्याचे काम सुरू होते. स्लॅब कोसळण्याची घटना अतिशय गंभीर आहे. या इमारत बांधकामाचा दर्जा, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करण्यात येत होता किंवा कसे, तसेच स्लॅब टाकण्याचे काम तांत्रिकदृष्टया हे योग्य होते किंवा कसे याची सखोल चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली आहे. या समितीने संबंधित इमारत बांधकामाची तांत्रिकदृष्टया योग्य होते किंवा कसे याचा शोध घेऊन प्राथमिक चौकशी अहवाल बुधवारी (एक ऑक्टोबर २०२५) आयुकत कार्यालयास सादर करावा असे आदेशात म्ह्टले आहे,