महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : उच्च शिक्षण कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील शिक्षण सहसंचालक डॉ. हेमंत नाना कठरे, कनिष्ठ लिपिक अनिल जोंग आणि स्टेनो प्रविण शिवाजी गुरव या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (पाच जुलै २०२३) रंगेहाथ पकडले. तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कार्यालयातच ही कारवाई झाली. पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.
भ्रष्ट कारभारामुळे वादग्रस्त ठरलेल्या शिक्षण सहसंचालक कार्यालयावर ही झालेली पहिलीच कारवाई होय. डॉ. हेमंत कठरे यांच्याकडे शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविला होता. डॉ. कठरे हे राजाराम महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत. डॉ. कठरे यांच्याकडे चार मे २०२३ रोजी शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. कठरे यांनी १४ जुलै २०२१ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीतही शिक्षण सहसंचालकपदाचा कार्यभार सांभाळला होता.
मार्च एप्रिल २०२३ मध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील विविध सिनीअर महाविद्यालयात प्राध्यापक भरती झाली होती. या भरती प्रकरणात लाखो रुपयांची लाच घेतल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या भरती प्रक्रियेवर योग्य पर्यवेक्षकीय नियंत्रण नसल्याचा आक्षेप ठेवत तत्कालिन शिक्षण सहसंचालक राजेसाहेब मारडकर यांची अन्यत्र बदली केली होती. त्यामुळे रिक्त् झालेल्या शिक्षण सहसंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. कठरे यांच्याकडे सोपविला होता.
दरम्यान शिक्षण सहसंचालक कार्यालयातील कामकाज नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. शैक्षणिक संस्थे अंतर्गत नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या दोन वेगवेगळ्या हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेस करिता आवश्यक त्या सोयी सुविधा आहेत अगर कसे याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी संबंधितांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती तीस हजार रुपये निश्चित केली. बुधवारी संबंधित तक्रारदाराकडून तीस हजार रुपये स्विकारताना कारवाई झाली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस हेड काँन्स्टेबल प्रकाश भंडारे, विकास माने, सुनील घोसाळकर, पोलिस काँन्स्टेबल रुपेश माने, मयूर देसाई, संदीप पवार, उदय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.