
कळंबा येथे जिल्हा बँक प्रचार मेळाव्यात खासदार संजय मंडलिकांची टीका
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘देशाचे राजकारण अदानी-अंबानी चालवीत आहेत अशी स्थिती आहे. त्याच पद्धतीने कोल्हापुरात दोन नेते जिल्ह्याचे सोयीचे राजकारण करत आहेत. जिल्ह्यातील या ‘अदानी-अंबानी’ यांचे हे सोयीचे राजकारण कोल्हापूरची स्वाभिमानी जनता सहन करणार नाही. या अदानी-अंबानीपासून जिल्हा वाचवायचा आहे. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी परिवर्तन आघाडी स्थापन करुन जिल्हा बँकेची निवडणूक लढवित आहे.’अशी खरमरीत टीका खासदार संजय मंडलिक यांनी मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता केली.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनाप्रणित ‘राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडी’चा मेळावा गुरुवारी (ता.३० डिसेंबर) झाला. कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा आणि गगनबावडा ठरावधारकांचा मेळावा आयोजित केला होता. कळंबा येथील अमृतसिद्धी मंगल कार्यालय येथे झालेल्या मेळाव्यात, सत्तारुढ आघाडीचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर अनेकांनी टीकास्त्र सोडले.
जिल्हा बँकेत राजकीय पादत्राणे बाजूला ठेवून एकत्र आलो आहोत या पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा खासदार मंंडलिक यांनी समाचार घेतला.तसेच दोन्ही काँग्रेस आणि भाजप मित्र पक्ष आघाडीवर निशाणा साधताना मंडलिक म्हणाले, ‘जिल्ह्यातील नेते मंडळी राजकीय जोडे बाजूला ठेवून बँकेत एकत्र आलो आहोत हे सांगत आहेत, मात्र बँकेतून बाहेर पडताना ते भाजपाचे जोडे घालून बाहेर पडतात की काय ?’अशी शंका येत असल्याचा टोमणा मारला. आपण बँकेचे बदनामी होईल असे एकही विधान केले नाही. असेही मंडलिक यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेने मुश्रीफांना भरभरून दिले असे मी म्हटले नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास केला. शिवसेनेने दोन्ही काँग्रेसला शिक्षक व पदवीधर मतदारसंघात भरभरुन मते दिली. गोकुळची निवडणूक आणि जिल्हा परिषद येथे मदत केली. मात्र काही मंडळी कार्यकर्त्यांची अडवणूक करत सोयीचे राजकारण खेळत आहेत. या स्थितीत कोल्हापूर जिल्हयाचे स्वाभिमान टिकवण्यासाठी निवडणूक लढवित आहेत. बँकेचा कारभार चांगला केला म्हणता ना मग टोकन देणे, शपथा घालणे, उचलून नेणे हे प्रकार कशासाठी ? असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून केला.मंडलिक पुढे म्हणाले,‘ प्रत्येक निवडणुकीत काही मंडळी वेगवेगळी सोंग घेत आहेत. मात्र मतदार दूधखुळा नाही.रोज उठून भाजपला शिव्या घालायचे आणि निवडणुकीत भाजपला सोबत घ्यायचे हे जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका सभासदांना रुचणार नाही.’
‘दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी आपणाला स्वाभिमानी राजकारणाची शिकवण दिली आहे. रोज सकाळी त्यांच्या फोटोसमोर उभे राहून नमस्कार करताना मला वाटत राहते.ते म्हणत असतील, ‘ तू खासदार झालास, कारखान्याचा चेअरमन आहेत, जिल्हा बँकेत संचालक आहेत. मात्र सामान्य लोक, कार्यकर्ते यांच्या स्वाभिमानीसाठी काय करतोस. कोल्हापूरचा हा स्वाभिमान टिकवण्यासाठी ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. या सगळयांचे संरक्षण करण्यासाठी परिवर्तन आघाडीची मोट बांधली.’
याप्रसंगी प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार संपतराव पवार-पाटील, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा बँकेचे संचालक पी.जी.शिंदे, संचालक व उमेदवार बाबासाहेब पाटील आसुर्लेकर,जिल्हाप्रमुख संजय पवार, प्रा.शहाजी कांबळे, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या शुभांगी पोवार यांची भाषणे झाली. गोकुळचे संचालक अजित नरके यांनी स्वागत केले. शेकापचे केरबा पाटील यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक सुनील मोदी यांनी मतदान प्रक्रिया संबंधी माहिती दिली.
मेळाव्याला गोकुळचे संचालक एस. आर.पाटील, शेकापचे अशोक पवार, बाबासाहेब देवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, तालुका प्रमुख विराज पाटील, अवधूत साळोखे, स्मिता मांडरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उमेदवार विश्वास जाधव, रवींद्र मडके, उत्तम कांबळे, रेखा कुराडे, लतिका शिंदे, अॅड. विजयराव यशवंत पाटील, क्रांतिसिंह पवार-पाटील उपस्थित होते.