महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर
लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने व्यापाऱ्यांना कमर्शिअल दराऐवजी घरगुती वापराच्या दराप्रमाणे पाणी बिल आकारावे, ज्या नागरिकांनी बिल भरले आहे व ज्यांची रक्कम जास्त होत आहे, त्यांना पुढील बिलात सूट द्यावी, अशा मागण्या महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे सोमवारी केल्या. त्यानुसार प्रशासनाने कोणताही दंड आकारलेला नाही व डिसेंबर महिन्यातील वापराप्रमाणेच बिले काढण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊन काळासाठी व्यवसायिकांना पाणी बिल सवलत व वृक्ष संवर्धन याबाबत आढावा बैठक घेण्याचे पत्र स्थायी सभापती संदिप कवाळे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार महापौर निलोफर आजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत सोमवारी बैठक झाली.
यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, गटनेते सत्यजीत कदम, विरोधी पक्षनेते विजय सूर्यवंशी यांनी मते मांडली. पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना सलवतीचा लाभ द्या, नेमकी झाडे कुठे लावायची याचे नियोजन करा आदी विषयांवर चर्चा झाली. आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी एखादे धोकादायक झाड तातडीने तोडायचे असेल तर त्यासाठी माझी स्वाक्षरी घेऊन तत्काळ परवानगी घ्यावी, असे सांगितले.