लाच घेताना हेरले ग्रामपंचायतीमधील दोघा कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले
schedule10 Oct 25 person by visibility 120 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शु्क्रवारी (१० ऑक्टोबर २०२५) हातकणंगले तालुक्यातील हेरले ग्रामपंचायतमधील दोघा कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. दिवाबत्ती कर्मचारी राहुल सहदेव निंबाळकर व रोजगार सेवक सूरज जिनगोंडा पाटील या दोघांवर एलसीबीच्या पथकाने कारवाई केली. वीस हजार रुपयांची लाच घेताना त्यांच्यावर त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुल मंजूर आहे. या घरकुलाचे प्रलंबित हप्ते कधी मिळणार ? यासंबंधीची विचारणा करण्यासाठी तक्रारदार गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांनी तेथील अधिकाऱ्यांना २५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदारांनी यासंबंधीची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळविली. या विभागाने सापळा रचून त्या दोन कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले. २५ हजारपैकी २० हजार रुपये स्वीकारताना ही कारवाई झाली. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हेड कॉन्सटेबल सुधीर पाटील, संदीप पवार, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांनी ही कारवाई केली.