जिल्ह्यात ग्रीन डे उत्साहात ! जिल्हाधिकारी- सीईओ सायकलवरुन ऑफिसला, प्रशासकांचा बसमधून प्रवास !!
schedule10 Oct 25 person by visibility 140 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने शुकव्रारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘ग्रीन डे’ उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी स्वतः सायकलचा वापर करुन कार्यालयात येत उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी ताराबाई पार्क येथील आयुक्त निवासस्थान ते महाराणा प्रताप चौकापर्यंत केएमटी बसमधून प्रवास केला. त्यांनी, नागरिक व शाळकरी मुलांशी संवाद साधला.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ हे सायकलवरुन कार्यालयापर्यंत आले. अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर या कार्यालयापर्यंत चालत आल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे हे चालत कार्यालयात पोहोचले. या अभिनव उपक्रमाद्वारे कोल्हापूर जिल्ह्याने देशभरात पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण केला असून, हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता न राहता वर्षभर आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणावा, असे आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. महापालिका, जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक जीवनशैलीची शपथ घेण्यात आली. जिल्हा परिषदेत वीज वापरही बंद होता. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात रोज २५० ते २८० युनिट वीज वापरली जाते. शुक्रवारी १२२ युनिट वीजेची बचत झाली.
अधिकारी-कर्मचारी 'ग्रीन डे’ उपक्रमात सहभागी झाले. दिवसभर वीज, इंधन, कागद, प्लास्टिक आणि मोबाइल यांचा कमीत कमी वापर करुन या उपक्रमात सहभाग नोंदविला. काहीजण बसद्वारे कार्यालयापर्यंत पोहोचले. तर कोणी चालत ऑफीस गाठले. हा उपक्रम दर दिवशी साजरा करण्यात यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले. ‘ग्रीन डे’ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी वीज व इंधनाचा वापर कमी करुन, कार्यालयीन कामकाजात कागदाऐवजी डिजिटल प्रणालीचा वापर, लिफ्टऐवजी जिन्याचा वापर तसेच प्लास्टिकमुक्त उपक्रमांचा अवलंब केला.