रणजितसिंह पाटील, राजेखान जमादारांचा राष्ट्रवादीत प्रवेश ! मुश्रीफांचा प्रविणसिंह पाटलांना सल्ला, दिल्या घरी सुखी राहा !!
schedule09 Oct 25 person by visibility 88 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील व शिवसेना- एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुंबई येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी बोलताना मुश्रीफ प्रवीणसिंह पाटील यांचे नाव न घेता म्हणाले, ‘रणजीतसिंह पाटील व राजेखान जमादार यांच्या प्रक्ष प्रवेशाची चर्चा सुरू होती. मी त्यांना सांगत होतो की, ते आमच्याकडे आहेत मी त्यांचा विश्वासघात करणार नाही. मी त्यांना कन्व्हिन्स करीन. परंतु; आई अंबाबाई आणि श्री. बाळूमामा यांच्याच मनात असावं. त्यामुळेच ते गेले आणि हे आले. मी काही त्यांना जा म्हटले नाही. ते का गेले हे कोडे मला पडलेले आहे. आत्ता या विषयावर मी पुन्हा बोलणार नाही. दिल्या घरी सुखी रहा, अशा माझ्या त्यांना शुभेच्छा !रणजीतसिंह पाटील आणि राजेखान जमादार यांच्यामुळे पक्षाला बुलडोझर आणि जेसीबीचे बळ मिळाले आहे. पक्षात येऊन चूक केली असे त्यांना वाटणार नाही, असा योग्य तो मानसन्मान आणि विश्वासही देवू. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची मी शपथ घेतली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी हा सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष असेल.’