डिबेंचर कपातीच्या विरोधातील मोर्चात शौमिका महाडिक सहभागी होणार
schedule15 Oct 25 person by visibility 299 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने केलेल्या डिबेंचर कपातीच्या विरोधात प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादक गुरुवारी (१६ ऑक्टोबर २०२५) जनावरासहित गोकुळवर मोर्चा काढणार आहेत. सर्किट हाऊस ते ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी या मोर्चात प्राथमिक दूध संस्था व दूध उत्पादकांसोबत सहभागी होणार असल्याचे म्हटले आहे. महाडिक यांनी म्हटले आहे, ‘सोळा ऑक्टोबर रोजी काढण्यात येणारा मोर्चा हा गोकुळ विरोधात नाही. डिबेंचर कपातीच्या विरोधात हा मोर्चा आहे. गोकुळ प्रशासनाने अंतिम दूध दर फरकापोटी १३६ कोटीहून अधिक रक्कम प्राथमिक दूध संस्था व उत्पादकांना दिली. मात्र त्या फरकाच्या रकमेत जवळपास ४५ टक्के रक्कम डिबेंचरच्या नावाखाली कपात केली आहे. हा प्राथमिक दूध संस्थेवर अन्याय आहे. कपात केलेली रक्कम परत मिळावी यासाठी प्राथमिक दूध संस्थांनी गोकुळ प्रशासनाकडे मागणी केली. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नाही. यामुळे दूध संस्था व दूध उत्पादक हे जनावरासहित मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात आपण सहभागी होणार आहेत. डिबेंचर कपातीची रक्कम संबंधितांना परत मिळावी, या दोन्ही घटकांना न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा आहे.’