सुरेश शिपूरकर, शैलजा साळोखे यांना ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार
schedule15 Oct 25 person by visibility 79 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्येष्ठ टेबल टेनिस खेळाडू श्रीमती शैलजा साळोखे यांना यंदाचा ब्रँड कोल्हापूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दैदिप्यमान यश मिळविलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुणवंतांचा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते शनिवार दि.18 ऑक्टोबर रोजी निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होणार असल्याची माहिती ब्रँड कोल्हापूर समिती सदस्यांनी दिली.
यावर्षी पॅरीस ऑलंपिक ब्रॉन्झ पदक प्राप्त स्वप्निल कुसाळे, बिरदेव डोणे यांच्यासह युपीएससी परीक्षेतील यशस्वी गुणवंत, दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड्स अल्ट्रा मॅरेथॉन मधील यशस्वी धावपटू, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर यांच्यासह कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या वर्षभरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे. ब्रँड कोल्हापूर समितीचे सदस्य उदय गायकवाड, प्राचार्य अजेय दळवी, चेतन चव्हाण, अनंत खासबारदार, भरत दैनी, डॉ. अमर आडके, प्राचार्य डॉ. महादेव नरके, अनुराधा कदम, विनायक पाचलग, संग्राम भालकर, ऐश्वर्य मालगावे, डॉ. राजेंद्र रायकर, सचिन लोंढे-पाटील यांनी ही माहिती दिली.