प्रशासक उतरल्या रस्त्यावर, दर्जाहीन कामांमुळे शहर अभियंता रमेश मस्करसह पाच जणांना नोटीस !
schedule15 Oct 25 person by visibility 274 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापर : शहरातील रस्त्यांच्या कामांची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी सरकारच्या व महापालिकेच्या निधीतून मंजूर कामे मुदतीत न केल्याने व काही ठिकाणची कामे दर्जेदार नसल्याने शहर अभियंता रमेश मस्कर व उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना कारणे दाखवा नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी टेंबलाई उड्डान पूल ते टाकाळा, पी.एन.पाटील बंगला ते विजय बेकरी, सायबर चौक ते माऊली पुतळा चौक ते जगदाळे हॉल राजारामपूरी, गोखले कॉलेज चौक ते यल्लमा मंदीर ते हॉकी स्टेडियम ते संभाजीनगर, आयटीआय कॉलेज, कळंबा साईमंदीर, नविन वाशीनाका, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर ते फुलेवाडी नाका ते जाऊळाचा गणपती मंदीर, गंगावेश ते महापालिका मुख्य इमारत, वायल्डर मेमोरियल चर्च ते आदित्य कॉर्नर या रस्त्यांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार उपस्थित होते.
यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी शासनाच्या व महापालिकेच्या स्वनिधीमधून मंजूर असलेली कामे तात्काळ गुणवत्तापुर्ण करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. शहरातील रस्त्यांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.मात्र निधी मंजूर करुनही कामे पूर्ण केली नाहीत. ही कामे तातडीने सुरु करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. तसेच पुढील दोन आठवडयात पुन्हां फिरती करुन सर्व कामांची गुणवत्ता व रस्त्यांची तपासणी करणार असलेचे प्रशासकांनी सांगितले. यामध्ये दिरंगाई झाल्यास उपशहर अभियंता यांच्यावर सक्त कारवाई करणार असलेचे सांगितले. त्याचबरोबर एनकॅपमधून परिख पुलासाठी अडीच कोटी, फुलेवाडी रिंगरोडसाठी दिड कोटी मंजूर केले असलेने सदरची कामे मुदतीत पुर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यापुर्वीही रिंगरोडसाठी निधी मंजूर करुन सदरची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. त्याचबरोबर उर्वरीत रस्ते दुरुस्तीसाठी चारही विभागीय कार्यालयांना दोन कोटी निधी महानगरपालिका स्वनिधीमधून मंजूर करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या निधीमधून एक कोटी चारही विभागीय कार्यालयांना पहिल्या टप्यात पॅचवर्कच्या कामासाठी दिले होते. यामध्ये फक्त बेसवर्कची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सिल्कोट मारले नाी. यानंतर दुसऱ्या टप्यात आणखीन एक कोटी मंजूर केली असूनही ती सुरु न केलेने व केलेल्या कामाचा दर्जा नसलेने प्रशासकांनी उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, अरुण गुजर, निवास पोवार यांना त्यांची वार्षिक वेतनवाढ का थोपवू नये, उपशहर अभियंता यांचा पदाचा अतिरिक्त कार्यभार का काढून घेऊ नये याबाबत कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शहर अभियंता रमेश मस्कर यांनी प्रशासकांनी निधी मंजूर करुन देऊनही आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या उपशहर अभियंता यांच्यावर नियंत्रण न ठेवलेबद्दल त्यांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली आहे. ठेकेदार पृथ्वीराज पाटील यांनी मंजूर कामे मुदतीत सुरु न केलेने नोटीस बजाविण्यात आली आहे.