संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्वाच्या : पोलिस अधिकारी प्रिया पाटील
schedule14 Oct 25 person by visibility 113 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : "वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या विचारांना दिशा देते, वक्तृत्वामध्ये फक्त विचारांचे आदान प्रदान नसते तर आत्मविश्वास, नेतृत्व गुण महत्वाचे असतात चांगला श्रोता आहे तोच चांगला वक्ता बनू शकतो. वाचनानंतर चिंतन, मनन करणे गरजेचे आहे. समाजातील विविध क्षेत्रांमध्ये संवाद कौशल्य अतिशय महत्त्वाचे आहे ते विकसित होण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा महत्त्वपूर्ण आहेत असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील यांनी केले.
न्यू कॉलेज कोल्हापूरच्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा.डी. बी. पाटील व्याख्यानमाला व सांस्कृतिक कार्यक्रम समिती कोल्हापूरच्यावतीने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंगळवारी (१४ ऑक्टोबर) ही स्पर्धा झाली.
पोलिस अधिकारी पाटील म्हणाल्या, 'आजचा युवक हा भविष्यातील जबाबदार नागरिक आहे. उत्साहाने ओतप्रोत भारलेला, नव्या वाटा चोखाळणारा, प्रश्न विचारणारा, बदल घडवून आणणारा आणि सामाजिक भान जपणारा , सदैव जागरूक असणारा आहे. या सर्व जडणघडणीमध्ये वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरतात."
चेअरमन के. जी. पाटील म्हणाले 'विद्यार्थ्यांनी अतिशय सजग राहून आपले करिअर निवडणे गरजेचे आहे.’असे नमूद केले. कार्यक्रम समितीचे प्रमुख व संस्थेचे संचालक प्रा. विनय पाटील यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धा समन्वयक डॉ. कविता गगराणी यांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रा. डी. जी. किल्लेदार, खजाननीस वाय. एस. चव्हाण, संचालक वाय. एल, खाडे, पी. सी. पाटील, श्रीमती सविता पाटील, न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, आजीव सेवक उदय पाटील उपस्थित होते. प्रा. डॉ. मनीषा नायकवडी व प्रा. उमा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. आर. डी. ढमकले यांनी आभार मानले.