महापालिकेचे शैक्षणिक व्हिजन, शाळा विकासासाठी नऊ समित्या ! ७० शिक्षकांचा सहभाग, विद्यार्थ्यांना जर्मन-फ्रेंच-स्पॅनिश भाषांची तोंड ओळख !!
schedule15 Oct 25 person by visibility 179 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या मालकीच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षकांच्या सक्रिय सहभागातून नऊ विषयांच्या विशेष समित्या स्थापना केल्या आहेत. शाळा विकासासाठीचा कृती आराखडा बनविला आहे. तसेच सीएसआर फंडाचा प्रभावीपणे वापर होणार आहे. विकासाच्या उपक्रमांना मूर्त स्वरूप देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत एकूण ७० शिक्षक सक्रियपणे काम करणार आहेत.
महानगरपालिका शाळांच्या शैक्षणिक विकासाला गती देण्यासाठी मनपा प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन उपायुक्त किरणकुमार धनवाडे आणि प्रशासन अधिकारी डी. सी. कुंभार यांच्या पुढाकाराने नुकतीच एक महत्त्वपूर्ण ‘शिक्षक संवाद परिषद’ आयोजित करण्यात आली होती. मनपा शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता. प्रशासन अधिकारी कुंभार यांच्या संकल्पनेतून नऊ विशेष समिती स्थापन केल्या.
शिक्षक संवाद परिषदेत उपायुक्त धनवाडे यांनी महानगरपालिकेचे शैक्षणिक ‘व्हिजन’ (ध्येय) स्पष्ट केले. यातंर्गत इयत्ता तिसरीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना वाचन, लेखन आणि गणित नैपुण्य प्राप्त करून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. मनपा शाळांमध्ये जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या भाषांची तोंड ओळख, प्लास्टिक व्यवस्थापनात विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, ‘विद्यार्थी स्टार सिस्टीम’ लागू करणे आणि कोल्हापूरच्या समृद्ध संस्कृतीची विद्यार्थ्यांना ओळख करून देणे यावर त्यांनी भर दिला. तसेच, विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘सृजनशीलता महोत्सव’ आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या शिक्षक संवाद परिषदेला ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ . सुनीलकुमार लवटे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका मनीषा पांचाळ यांनी केले, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी यांनी आभार मानले. या परिषदेला कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत कुंभार उपस्थित होते.
……………
महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश या परदेशी भाषांची तोंड ओळख व्हावी, आनंददायी शिक्षणासाठी स्मार्ट हॅपी इ क्लास इ. नवनवीन उपक्रम महानगरपालिका शाळांमध्ये राबवणार आहोत.
– किरणकुमार धनवाडे, उपायुक्त कोल्हापूर महापालिका
……………………………..
शाळा विकासासाठी स्थापन समित्यांमध्ये स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षा, स्मार्ट हॅपी ई-क्लास, विज्ञान-गणित, तंत्रस्नेही, इंग्रजी, भाषा, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसिद्धी समिती यांचा समावेश आहे. या समित्यांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये वेगवेगळे आणि प्रभावी उपक्रम राबवले जाणार आहेत. या अंतर्गत मनपा शाळा मधील शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षा निकाल वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
– डी . सी. कुंभार प्रशासन अधिकारी, प्राथमिक शिक्षण समिती