वाचन प्रेरणा दिनी ग्रंथ भेट , शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा हटके उपक्रम !
schedule15 Oct 25 person by visibility 91 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी एकत्र येत साहित्यिक उपक्रम राबविला. शहीद महाविद्यालयातील शिक्षक,विद्यार्थिनींनी स्वतःहून विविध शैक्षणिक, प्रेरणादायी आणि साहित्यिक ग्रंथ ग्रंथालयास भेट म्हणून दिले.
निमित्त होते, शहीद शिक्षण प्रसारक मंडळ, तिटवे संचलित शहीद सिताराम पाटील ग्रंथालयात “वाचन प्रेरणा दिन” या कार्यक्रमाचे. अतिशय उत्साहात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. ‘ ज्ञानाचा खजिना उघडण्यासाठी पुस्तकाइतका सुंदर मार्ग दुसरा नाही. आणि याच भावनेतून ग्रंथ भेट उपक्रम राबविला. यामुळे वाचनाची आवड, विचारांची खोली आणि पुस्तकांविषयी आत्मीयता विद्यार्थ्यांमध्ये अधिक दृढ झाली.’ अशा भावना व्यक्त करण्यात आल्या. ग्रंथ भेट दिलेल्या विद्यार्थिनींना व शिक्षकांना शहीद महाविद्यालयामार्फत आभारपत्र देण्यात आले.या उपक्रमाचे विशेष कौतुक करत डॉ. रत्नाकर पंडित यांनी सांगितले की, “विद्यार्थिनींनी ग्रंथालयाशी आत्मीय नातं जोडून ज्ञानदानाचा खरा सण साजरा केला आहे. हा उपक्रम समाजात वाचनसंस्कृती रुजविणारा आणि प्रेरणादायी आहे.
उपप्राचार्य सागर शेटगे यांनी स्वागत केले. प्रा. अविनाश पालकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाचे आयोजन शहीद सीताराम पाटील ग्रंथालयाने आणि एन.एस.एस. विभागाने केले होते. कार्यक्रम प्राचार्य प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी प्रा. विशालसिंह कांबळे मनोगत व्यक्त केले. प्रा. दिग्विजय कुंभार, प्रा. सिद्धता गौड, प्रा. शुभांगी भारमल, प्रा. पुनम शिंदे उपस्थित होते. मधुरा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल संग्राम किल्लेदार यांनी आभार मानले.