नगररचना कार्यालयात जनसुनावणी ! ढिम्म अधिकारी, आंदोलकांकडून दगड पूजण्याचा प्रकार!!
schedule14 Jul 25 person by visibility 59 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ सोमवारी जनसुनावणी आयोजित केली होती. यामध्ये जवळपास ४० लोकांनी नगररचना विभागाशी निगडीत कामासंबंधी तक्रारी नोंदविल्या. पण अधिकाऱ्यांकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आंदोलकांनी दगडाची पूजा करत निषेध नोंदविण्याचा प्रयत्न केला. अधिकारी हे दगडासारख्या मनोवृत्तीचे आहेत, अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरे अशी टीका केली. दरम्यान पोलिसांनी आदोलकांकडून दगड काढून घेत पूजा थांबविली.
सुमारे दोन तास चाललेल्या जनसुनावणीदरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीवर अधिकारी निरुत्तर झाले. कोल्हापूर नेक्स्ट चे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर, विजय खाडे यांच्या नेतृत्वाखाली तक्रारदार नागरिक नगररचना कार्यालयात दाखल झाले. अधिकार्यांनी केबिनमध्ये या असे आवाहन केल्यानंतर बाहेर उघड्यावरच सुनावणी घ्या असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. माजी नगरसेवक ठाणेकर यांनी या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगितली व मागील वर्षी दिलेले निवेदन व त्यावरील कार्यवाही यासंबंधी विचारणा केली. अनेक नागरिकांनी आपल्या समस्या पुन्हा एकदा अधिकार्यांसमोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने बेकायदेशीर विनापरवाना बांधकामांवरील कारवाईचा मुद्दा होता.
प्रभाकर कुलकर्णी यांनी पाचवा मजला बेकायदेशीर ठरवल्यानंतर सहाव्या मजल्याला कशी परवानगी देता असा सवाल केला. यशवंत माने यांनी उच्च न्यायालयाचा आदेशांचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. शेफाली मेहता यांनी पार्किंग मधील विनापरवाना बांधकामांची जंत्रीच वाचून दाखवली. प्रसाद पाटील यांनी तीन वर्षापूर्वी केलेल्या तक्रारींवर कारवाई न झाल्यामुळे चार मजली इमारत बांधल्या गेल्याचे निदर्शनास आणून दिले. अस्लम जमादार, ओंकार गोसावी, मिथुन मगदूम, गणेश राणे, शुभम महेकर, सुहास गुरव, उदय पाटील यांनीही आपल्या तक्रारींबद्दल विचारणा केली. मात्र या तक्रारीबाबत अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तरे मिळाली नाहीत. यामुळे कार्यकर्ते आणि नागरिक अत्यंत संतप्त झाले. त्यानंतर नगररचना झगडे, सहायक नगर रचनाकार एन.एस. पाटील व इतर अधिकाऱ्यांच्यासमोरच " तुमच्यापेक्षा दगड बरा" असे म्हणून दगड पूजण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचार्यांनी तातडीने दगड बाजूला केले.