स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आप उतरणार
schedule14 Jul 25 person by visibility 32 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. जिल्हा तसेच शहरातील अनेक मूलभूत प्रश्नांवर आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारणारा पक्ष म्हणून आपने आपली ओळख बनवली आहे. कोल्हापूर शहरातील रस्ते, पाणी, कचरा उठाव, स्वच्छतागृहे, जलतरण तलाव या सारख्या ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे शहरातील मतदारांसाठी आप आगामी निवडणुकांसाठी पर्याय बनून प्रस्थापितांसाठी आवाहन बनू शकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इचलकरंजीची पहिली महापालिका निवडणुक असल्याने या निवडणुकीत शहराच्या शाश्वत विकासाचे धोरण घेऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे.कोल्हापूरला हवा बदल नवा या मोहिमेखाली स्वयंसेवक तथा कार्यकर्ता नोंदणी अभियानाची सुरुवात आप ने केली. या नोंदणी अभियानाद्वारे जिल्ह्यातील दहा हजार लोकांना पक्षासोबत जोडण्याचे लक्ष असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बदलात सामील होण्यासाठी 8180867761 या नंबरवर मिस्ड कॉल द्या अथवा joinaapkop.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी असे आवाहन आप च्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, वसंत कोरवी, किरण साळोखे, अभिजित कांबळे, समीर लतीफ, सूरज सुर्वे, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, अनिल जाधव, राकेश गायकवाड, सी व्ही पाटील, संजय नलवडे, उषा वडर, आदम शेख, स्वप्नील काळे, महंमदशरीफ काझी, उमेश वडर, रमेश कोळी, सफवान काझी आदी उपस्थित होते.