उज्ज्वल निकमांच्या खासदारपदी निवडीनंतर कोल्हापुरात आनंदोत्सव ! देसाई, राणे परिवाराशी कौटुंबींक स्नेह !!
schedule13 Jul 25 person by visibility 419 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर कोल्हापुरातील आजोळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देसाई व राणे कुटुबीयांतर्फे साखर पेढा भरवून आनंदाचा क्षण साजरा झाला.शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई यांनी, ‘उज्ज्वल निकम म्हणजे डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. ’अशा शब्दांत गौरवोल्लेख केला.
‘बुद्धिमत्ता, कायद्याचे ज्ञान आणि नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी नेहमी सज्ज असलेल्या पद्मश्री अॅड. निकम यांचा यशस्वी जीवन प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.’अशा भावना शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. मंजिरी मोरे यांनी व्यक्त केल्या. अभिजीत राणे यांनीही अॅड. निकम यांच्याशी निगडीत आठवणी सांगितल्या.
निकम हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील. त्यांचे वडील बॅरिस्टर देवराज माधवराव निकम हे १९६२ ते १९६७ या कालावधीत आमदार होते. न्यायाधीश व बॅरिस्टरपदी चांगले कार्य त्यांनी केले होते. निकम यांच्या आई विमलादेवी या कोल्हापूर मधील शिक्षणमहर्षी प्राचार्य एम. आर. देसाई यांच्या भगिनी. माजी महापौर सुभाष राणे यांच्या पत्नी मीना या उज्ज्वल निकम यांच्या सख्या भगिनी.
अॅड. उज्ज्वल निकम यांनी कोल्हापूरशी स्नेह जपला आहे. विविध कार्यक्रम, समारंभाच्या निमित्ताने ते कोल्हापूरकरांच्या संपर्कात असतात. त्यांनी जाहीर कार्यक्रमातून अनेकदा, कोल्हापुरातील बालपणीच्या आठवणी उजाळा दिला आहे.माजी आमदार कै. दिलीपराव देसाई, शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई यांचे ते आते भाऊ असल्यामुळे लहानपणापासून आतापर्यंत त्यांच्यातील स्नेह त्यांनी जपला आहे.
ॲड निकम साहेब यांच्या राज्यसभा सदस्य निवडीनंतर न्यू शाहूपुरीतील देसाई व राणे यांच्या घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रा. जयकुमार देसाई ,श्रीमती.शिवानी देसाई, प्रा. डॉ.मंजिरी मोरे, युवा नेते दौलत देसाई, पृथ्वी मोरे तसेच सर्व देसाई परिवार व नातेवाईक उपस्थित होते. अॅड. उज्ज्वल निकम यांच्याविषयी बोलताना प्रा. जयकुमार देसाई म्हणाले, ‘आई बरोबर ते नेहमी आजोळी कोल्हापूरला येत असत. अॅड. उज्ज्वल निकम यांचे मोठे भाऊ प्रदीप हे गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये शिकले आहेत. अॅड. निकम यांनीही गोखले कॉलेजला अनेकदा भेटी दिल्या आहेत. त्यांच्यासोबतचा स्नेह कायम आहे.’