राज्यात २००० नवीन ग्रंथालये, करवीर नगरला पाच लाखाचा विशेष निधी- मंत्री चंद्रकांत पाटील
schedule14 Jul 25 person by visibility 51 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गावोगावी ग्रंथालये असणे हे महत्वाचे आहे. यासाठी राज्यात २००० नवीन ग्रंथालयांना मान्यता देण्यात आली आहे.’अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ज्या ग्रंथालयांना १५० वर्षे, १०० वर्षे व पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत. अशा ग्रंथालयांना राज्य सरकारकडून अनुक्रमे पाच लाख, तीन लाख व दोन लाख रुपयांचा विशेष निधी दिला जाणार आहे. करवीर नगरवाचन मंदिराला पाच लाखाचा निधी मिळेल असे पाटील यांनी सांगितले.
येथील करवीर नगर वाचन मंदिर या संस्थेला १७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. लेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ’शतकामृत स्मरणगाथा’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
याप्रसंगी बोलताना मंत्री पाटील यांनी, ‘ सरकराने वाचन संस्कृती वाढीसाठी ग्रंथालय धोरणात बदल केले आहेत. राज्यातील ग्रंथालयाच्या अनुदानात ४० टक्क्यांनी वाढ केली आहे. पावसाळी अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय झाला आहे. शिवाय ग्रंथालयाच्या श्रेणीवाढीलासाठी मान्यता दिली असून प्रक्रियेला सुरुवात होईल.’असे स्पष्ट केले. अभिराम भडकमकर म्हणाले, ‘करवीर नगर वाचन मंदिराने माझ्यातील लेखक घडविला. या संस्थेने माझे भावविश्व समृद्ध केले. वडिलांची बदली झाली आणि मी कोल्हापुरात दाखल झालो.आई, करवीर नगर वाचन मंदिराची सभासद होती.यामुळे येथून कायम पुस्तके नेत होतो.’
संस्थेचे कार्यवाह आशुतोष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. पुणे विभागाच्या ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर, कनवाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष सदानंद मराठे, कार्याध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण साळोखे, उपकार्याध्यक्ष उदय सांगवडेकर, सहकार्यवाह मंगेश राव, हिशेब तपासनीस दीपक गाडवे, संचालक डॉ. रमेश जाधव, अश्विनी वळीवडेकर, अनिल वेल्हाळ, अभिजीत भोसले, केदार मुनिश्वर, नंदकुमार दिवटे, मनिषा वाडीकर, संजीवनी तोफखाने, चंद्रशेखर फडणीस, शाम कारंजकर, महेश्वरी गोखले, ग्रंथपाल मनिषा शेणई आदी उपस्थित होते.