घुंगुरमाळा कवितासंग्रहाला कोल्हापूरच्या मातीचा गंध, संस्कृतीचा बाज
schedule13 Jul 25 person by visibility 33 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘घुंगुरमाळा’हा कवितासंग्रह म्हणजे मानवी भावभावनांचे उत्तम प्रकटीकरण आहे. विविध प्रकारच्या कवितांचा आविष्कार आहे. कवयित्री महानंदा मोहिते यांच्या अभिव्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा कृत्रिमपणा नाही. त्यांच्या कवितेला कोल्हापूरच्या मातीचा गंध आहे, संस्कृतीचा बाज आहे.’असे मत साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांनी व्यक्त केले.
कवयित्री मोहिते यांच्या ‘घुंगुरमाळा’या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवारी (१२ जुलै) कोल्हापुरात झाला. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक पचिंद्रे बोलत होते. समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, माई पब्लिकेशनच्या ममता सिंधुताई सपकाळ, प्रकाशक पूजा भडांगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पार पडला. येथील शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमाला साहित्यप्रेमींची गर्दी होती.
समीक्षक डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘घुंगुरमाळा’ म्हणजे एका अर्थी आठवणींची श्रृखंला. कवयित्री मोहिते यांनी अतिशय सुंदररित्या या आठवणींची कवितेच्या माध्यमातून गुंफण केली आहे. विविध विषयावरील कविता हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. या कविता मराठी भावकवितेला समृद्ध करणाऱ्या आहेत. छंद वळणाच्या कविता मनाला भावणाऱ्या आहेत. कवयित्रीची शब्दांवरील पकड स्पष्ट दिसते. कवयित्रीने बालपण, गावपण, लोकसंस्कृती हे सारे अतिशय उत्तमरित्या कवितेत उतरविले आहे.’ कविता लेखनामागील भूमिका उलगडताना कवयित्री मोहिते म्हणाल्या, ‘मौनी विद्यापीठाच्या आवारात बालपण व शिक्षण झाले. शिवाजी विद्यापीठात शिक्षण घेताना, पुढे पत्रकारिता करताना साहित्यिक क्षेत्रांतील लोकांशी संपर्क आला. वाचन-लेखनाची गोडी वाढली. भुदरगड तालुक्यातील लोकसंस्कृतीचा माझ्या कवितेवर प्रभावर आहे.’ अध्यक्षीय भाषण करताना मधुरिमाराजे छत्रपती यांनी, ‘सध्या ई लर्निंगचा जमाना आहे. नव्या पिढीला कवितेची ओळख घडली पाहिजे. अधिकाधिक लोकांपर्यत कविता पोहोचल्या पाहिजेत. यासाठी ईबुकचा पर्याय निवडावा. प्रा. डॉ. विनोद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. कवी अशोक भोईटे यांनी, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्यावरील कविता सादर केली.