उद्योग जगतासाठी पायोनियर उपक्रम आवश्यक ! स्वत:च्या पॅशनला जपा, नक्की यश मिळणार !!
schedule24 Feb 25 person by visibility 48 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘उद्योग जगतासाठी पायोनियरसारखे उपक्रम हे आवश्यक आहेत. यातून अभियंता घडण्याची प्रक्रिया होत असते. भारताचा भविष्यकाळ हा इनोव्हेशन, सृजनशीलता, स्टार्ट-अप्स, एआय अशा विविध क्षेत्रात सकारात्मक विचाराने काम करणाऱ्या तरुणाईमुळे नक्कीच आश्वासक आहे. प्रगती करायची असेल तर आतापासूनच स्वतःचे नेटवर्थ व नेटवर्क सशक्त केले पाहिजे. स्वतःच्या पॅशनला नक्की जपा एक ना एक दिवस ही पॅशन तुम्हाला यश मिळणार’अशा शब्दांत टाटा ऑटोकॉम्प हेन्ड्रिक्सन सस्पेन्शन प्रायव्हेट लिमिटेड,पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल कुलकर्णी यांना विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले.
येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय पायोनियर स्पर्धा झाली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून कुलकर्णी बोलत होते. संस्थेचे सचिव दीपक चौगुले हे अध्यक्षस्थानी होते. स्पर्धेमध्ये इंजिनिअरिंग सोबत पॉलिटेक्निक, फार्मसी व सायन्स कॉलेजमधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील सीएसबीएस विभागाला ‘बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट’ पुरस्काराने सन्मानित केले. मध्यवर्ती व विभागस्तरीय स्पर्धांमध्ये मिळून ५००० विद्यार्थी देशातल्या विविध राज्यातून सहभागी होते.
संस्था सचिव चौगुले यांनी विद्यार्थ्यांना पेटंट,स्टार्ट-अप्स, इनोव्हेशन यासाठी केआयटी भविष्यात अधिक जोमाने प्रयत्न करणार असल्याबद्दल सांगितले. पायोनियर मधील विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, संचालक डॉ मोहन वनरोट्टी ,पायोनियरचे निमंत्रक प्रा. प्रमोद जाधव उपस्थित होते. विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ. जितेंद्र भाट यांनी प्रास्ताविक केले. आयएसटीईच्या समन्वयक प्रा.अश्विनी शिंदे यांनी पायोनिअर स्पर्धेचा आढावा घेतला. अर्पण मांगनूर, सिया यरनाळकर, अमन कुरेशी, आयुषी वासनिक व विनायक उर्मनहट्टी यांनी सूत्रसंचालन केले. आयएसटीई स्टुडन्ट चाप्टरचे सचिव ओम दर्शन शिंदे पाटील यांनी आभार मानले.