गोकुळ कट्टा सांगणार दूध उत्पादकांची यशोगाथा !
schedule24 Feb 25 person by visibility 55 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातर्फे यशस्वी दूध उत्पादकांची यशोगाथा इतर दूध उत्पादकांना समजावी व दुग्ध व्यवसायासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘गोकुळ कट्टा’ स्टुडीओची उभारणी केली आहे. गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क येथे उभारलेल्या या स्टुडिओचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
याप्रसंगी आमदार पाटील म्हणाले, गोकुळने नेहमीच किफायतशीर दुग्ध व्यवसाय होण्यासाठी दूध उत्पादकांना विविध घटकांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे. तरुण वर्ग दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित व्हावा यासाठी त्याला दुग्ध व्यवसायातील सर्वकष माहितीसाठी ‘गोकुळ कट्टा’ प्रभावी माध्यम आहे.
चेअरमन डोंगळे म्हणाले, ‘गोकुळ कट्टयाच्या माध्यमातून संघाच्या विविध योजना, उपक्रम, जिल्ह्यातील यशस्वी दूध उत्पादकांच्या व गोकुळश्री विजेते यांच्या यशोगाथा व मुलाखती दूध उत्पादकांना मिळाव्या यासाठी गोकुळने ‘गोकुळ कट्टा’ (स्टुडिओ) तयार केला आहे. निश्चितच या स्टुडीओचा लाभ गोकुळच्या दूध उत्पादकांना होईल. या गोकुळ कट्टयाच्या रचनेमध्ये गाय, म्हैस, वैरण, मुक्त गोटा, दूध उत्पादक, दूध संस्था, बल्क कुलर युनिट या प्रतीकृतींचा समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले उपस्थित होते.