केआयटीत पायोनियर-२५चे दिमाखात उद्घाटन, ३५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
schedule22 Feb 25 person by visibility 462 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘वर्तमान व भविष्य काळामध्ये उद्योग जगताला स्वतःला आत्मविश्वासाने सादर करणारे,नेतृत्व करू शकणारे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम, सर्व समावेशक वृत्तीचे, प्रामाणिक व एक चांगला व्यक्ती म्हणून वावरणारे तरुण अभियंते हवे आहेत. भविष्यात स्वतःला अधिक कार्यक्षम करण्यासाठी पूरक ठरतात. पायोनियर सारख्या कार्यक्रमातून आयोजक व सहभागी विद्यार्थ्यांना अशा आवश्यक गुणांची जोपासना करण्याची संधी मिळते’ असे मत पुणे येथील कॉग्नीजंट कंपनीच्या वरिष्ठ एचआर मॅनेजर, शिल्पा महाजनी यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयामध्ये शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा पायोनियर २५ चे उद्घाटन झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून महाजनी बोलत होते. केआयटी संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अध्यक्ष हुदली म्हणाले ‘ देशातील तरुणाई ही भारताची ताकद आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय ठरवताना कोणत्या दिशेला आपल्याला जायचे आहे, आपल्या जीवनाचा हेतू काय आहे याबाबत सजग राहिले पाहिजे.आज आपला देश सर्वच अभियांत्रिकीच्या क्षेत्रात आधुनिकतेची कास धरत मार्गक्रमण करत आहे. विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेत वर्तमानामध्ये स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ’
संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी प्रास्ताविक केले. पायोनियर २५ चे निमंत्रक प्रमोद जाधव यांनी या वर्षीच्या स्पर्धेचा आढावा घेतला. स्पर्धेसाठी गोवा, दिल्ली, पंजाब, तमिळनाडू, ओरिसा, छत्तीसगड राज्यातूनही स्पर्धकांनी प सहभाग नोंदवला आहे. व्यासपीठावर सचिव दीपक चौगुले, विश्वस्त सुनील कुलकर्णी, रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय साठे विद्यार्थी उपक्रम डॉ.जितेंद्र भाट, प्रा.अश्विनी शिंदे, उपस्थित होते. निर्मल खोपडे, हार्दिक अग्रवाल, ऐश्वर्या कामत, भक्ती हुद्दार, अमन कुरेशी या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.आयएसटीई स्टुडंट चाप्टरच्या अध्यक्ष शिवांजली पाटील यांनी आभार मानले.
…………
मे महिन्यात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
केआयटी इंजिनिअरिंग कॉलेज,चीनमधील निंगशिया युनिव्हर्सिटी, यिनचुआनव, पोलंड मधील ए.जी.एच. युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १६-१७ मे २०२५ रोजी भारतात व २४-२५ मे २०२५ रोजी चीनमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे..या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेच्या वेबसाईटचे, तसेच माहितीपत्रकाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली यांच्या हस्ते करण्यात आले.