कोल्हापूर जिल्ह्यात घरकुल लाभार्थ्यांसाठी आम्ही सोबती घरकुल मोहिम –पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule22 Feb 25 person by visibility 104 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुलांची अंमलबजावणी करीत असताना आम्ही सोबती घरकुलाचे हा उद्देश समोर ठेवून घरकुल लाभार्थ्यांना विनाअडथळा दिलेल्या वेळेत आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करता येईल. यासाठी सर्व जिल्हा परिषद प्रशासनाने कार्य करावे, अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.
कोल्हापूर जिल्हा परिषद व करवीर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून दृक श्राव्य प्रणालीद्वारे बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात प्रत्येक पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर या कार्यक्रमाचे आयोजन व पुणे येथील मुख्य कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री प्रकाश यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांसोबत ऑनलाईन संवाद साधला. कोल्हापूर येथे यावेळी कार्यक्रमाला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस., प्रकल्प संचालक सुषमा देसाई, माजी सभापती राजू सुर्यवंशी आदी उपस्थित होते. विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे कार्यक्रम झाला. प्रातिनिधीक स्वरूपात खासदार महाडिक यांच्याहस्ते ११ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. यात मुडशिंगी ग्रामपंचायतीअंतर्गत साताबाई सोनुर्ले, धोंडुबाई सोनुर्ले, दत्तात्रय सोनुर्ले, सदाशिव सोनुर्ले, बाबुराव सोनुर्ले, रामदास सोनुर्ले, सर्जेराव सोनुर्ले, प्रकाश सोनुर्ले व रविंद्र सोनुर्ले, म्हाळुंगे ग्रामपंचायतीमधील रविंद्र चौगुले, कावणे येथील महिपती पाटील तर कावने ग्रामपंचायतीमधील विजय कारंडे यांचा समावेश होता.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांसाठी आम्ही सोबती घरकुलाचे मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावरती उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होणार आहे. घरकुलांचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता घेण्यात येणार आहे. १०० दिवसांमध्ये घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यासाठी महिला बालकल्याण विभागामार्फत घरातील महिलेला पिठाची गिरणी मोफत देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्याने महसूल विभागामार्फत देण्यात येणारे रेशन कार्ड, आधार कार्ड इत्यादी, ग्रामविकास व पंचायतराज मार्फत जल जीवन मिशन अंतर्गत नळजोड, उज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सुर्य घर योजना तसेच ग्रामपंचायत मार्फत सर्व शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
खासदार धनंजय महाडिक यांनी सर्वसामान्य लोकांना घरकुल योजनेमधून घरांना मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान व गृहमंत्री यांचे आभार मानले. महाडिक म्हणाले, ‘राज्यस्तरावरून आज २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरीत करण्यात आला. आम्ही सोबती घरकुलांचे या नाविण्यपूर्ण योजनेतून जिल्हा परिषद प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला वीज, शुद्ध पाणी, शौचालय सुविधा, सुर्य घर योजना तसेच उज्ज्वला योजनेतून गॅस देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. आता येत्या अधिवेशनात आम्ही १ लाख २० हजार घरकुल अनुदानात वाढ करीत अडीच लाख रुपये वाढविण्यासाठी मागणी करणार आहे.’ मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रास्ताविक केले. चंद्रहार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. गट विकास अधिकारी दिपाली पाटील यांनी आभार मानले.