खंडपीठप्रश्नी मुख्यमंत्र्यांची सोमवारी भेट घेणार ! राजेश क्षीरसागरांनी दिली माणिक पाटलांच्या आंदोलनस्थळी ग्वाही !!
schedule23 Feb 25 person by visibility 98 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्याकरिता कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन व्हावे अशी मागणी गेली ३० वर्षापासून होत आहे. कोल्हापूरच्या खंडपीठासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोमवारी (२४ फेब्रुवारी २०२५) रोजी भेट घेणार असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
हायकोर्टाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी पदवीधर मित्र संस्थेचे माणिक पाटील-चुयेकर हे गेले आठवडाभर कोल्हापुरात उपोषण करत आहेत. दसरा चौक येथे आंदोलन सुरू आहे. आमदार क्षीरसागर यांनी, रविवारी दसरा चौक येथील आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी क्षीरसागर म्हणाले, ‘ कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. तत्कालीन मुख्यमंत्री व सद्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी सकारात्मक आहेत. कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी शासन स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य न्यायमूर्ती यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या अधिवेशनातही विविध आयुधांच्या माध्यमातून या प्रश्नावर आवाज उठवू. सोमवारी, २४ फेब्रुवारीला, मुख्यमंत्री महोदयांची तातडीने भेट घेवून माणिक पाटील चुयेकर यांचे उपोषण सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू.’