महाडिकांची कार्यपद्धती, सामान्य माणसाला पद ! चालक बनला संचालक, शेतकऱ्यांचाही सन्मान!!
schedule12 Mar 25 person by visibility 598 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारात अनेकदा सामान्य कार्यकर्त्यांना, माणसांना पदे दिली. नगरसेवक, उपमहापौर, महापौर केले. सहकारी संस्थेत अध्यक्ष-उपाध्यक्षपदी संधी दिली. सामान्य माणसाला पदावर बसविण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीची पुन्हा एकदा प्रचिती आली. कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी महापालिकेतील सेवानिवृत्त वाहन चालक बाजीराव शामराव चौगुले यांची निवड केली. तर दिवंगत संचालक दिलीप उलपे यांचे चिरंजीव धीरज उलपे यांना संचालकपदी संधी दिली. धीरज उलपे हे शेतकरी आहेत. या निवडीचे कसबा बावडयातून स्वागत होत आहे. फटाक्यांची आतषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला.
प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. मंगळवारी (११ मार्च) या निवडी झाल्या. राजाराम कारखान्याचे संचालक नारायण बाळकृष्ण चव्हाण व दिलीप यशवंत उलपे यांच्या निधनाने संचालकपदाच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. या दोन जागांसाठी तीन मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. मंगळवारी या निवडणूक प्रक्रियेंतर्गत मावळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. अर्ज दाखल करण्यासाठी अर्धा तासाचा अवधी देण्यात आला. या कालावधीत बाजीराव चौगले व धीरज उलपे यांचे अर्ज दाखल झाले. दोन जागा आणि दोनच अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्या. या नूतन संचालकांचा माजी आमदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी मावळे व सहायक अधिकारी विजय पाटील यांचा सत्कार कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांच्या हस्ते झाला.
नूतन संचालक बाजीराव चौगले हे महापालिकेत चालक होते. महापालिकेत चालक म्हणून २९ वर्षे सेवा केली. त्यापैकी जवळपास २८ वर्षे ते आयुक्तांच्या वाहनावर चालक होते. दोन वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. दुसरे संचालक धीरज उलपे हे शेतकरी आहेत. दिवंगत संचालक दिलीप उलपे यांचे ते चिरंजीव आहेत. महाडिक यांनी नेहमी सामान्य कार्यकर्ते व व्यक्तींना विविध ठिकाणी काम करण्याची संधी दिली. राजाराम कारखान्यातही त्यांनी त्या कार्यपद्धतीचा अवलंब केला. नूतन संचालकांच्या निवडीचे कसबा बावडयातून स्वागत होत आहे.
……………