सिनेमा प्रेक्षकांच्या दारात-गावागावांत, तेंडल्याला हवे लोकांचे पाठबळ ! सवलतीच्या दरात आयोजन!!
schedule11 Feb 25 person by visibility 179 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मराठी सिनेसृष्टीत उत्तम कलाकृती तयार होतात, पण अनेक सिनेमांना थिएटर मिळत नाहीत.मार्केटिंगचा खर्च परवडत नाही. परिणामी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचत नाही…नेमकी हीच अडचण ओळखून आता सिनेमा लोकांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रेक्षकांच्या दारात, गावांगावात सिनेमा दाखविण्यासाठी ‘तेंडल्या’ची टीम तयार आहे. सवलतीच्या तिकीट दरात हा सिनेमा दाखविला जाणार आहे. या टीमला समाजातील विविध संस्था, संघटना, शाळा-कॉलेज यांनी साथ दिली तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वप्नं साकारणाऱ्या जिद्दी मुलांची कहाणी साऱ्यापर्यंत पोहोचेल. एका चांगल्या कलाकृतीला पाठबळ मिळेल. हा सिनेमा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, वाळवा येथील तरुणांनी एकत्र येऊन बनविला आहे.
‘तेंडल्या‘हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना आदर्श मानणाऱ्या दोन क्रिकेटवेडया मुलांची ही कथा आहे. एक जण गज्या तर दुसरा तेंडल्या. गज्या हा वडापचालक.तर तेंडल्या हा शाळकरी विद्यार्थी. ९० च्या दशकातील ही कहाणी. गज्याला, क्रिकेटचे सामना पाहण्यासाठी टीव्ही खरेदी करायचा आहे तर तेंडल्या या शाळकरी मुलाला स्थानिक क्रिकेट स्पर्धा जिंकायची आहे. गज्याकडे टीव्ही खरेदीसाठी पैसे नाहीत तर तेंडल्याकडे साधी बॅटही नाही… चाहत्यांचे क्रिकेटप्रेम, सचिन तेंडुलकरची क्रेझ आणि त्याची सामने पाहण्यासाठी करावी लागलेली प्रयत्नांची पराकाष्टा यामधून सिनेमा पुढे सरकत जातो.
२०१७ मध्ये हा सिनेमा तयार झाला. २०२३ मध्ये प्रदर्शित झाला. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण थिएटर न मिळाल्यामुळे अनेकांपर्यत पोहोचला नाही. हा सिनेमा अधिकाधिक लोकांनी पाहावा यासाठी प्रेक्षकांच्या दारात जाणार आहे. गावागावांत या चित्रपटाचे खेळ दाखविण्यात येणार आहेत. लोकांच्या सहकार्याने हा उपक्रम होणार आहे. त्याची सुरुवात मंगळवारी (११ फेब्रुवारी २०२५) कोल्हापुरात झाली. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज येथे पहिला विशेष शो झाला. हा शो निमंत्रितांसाठी होता.
अभिनेता भरत जाधव, स्वप्निल राजशेखर, सिनेमाचे दिग्दर्शक सचिन जाधव, क्रीडा समालोचक सुनंदन लेले, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, ऋतुराज इंगळे, चेतन चौगले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सचिव शीतल भोसले, केदार गयावळ, चेंबर ऑफ कॉमर्सचे संजय शेटे, धनंजय दुग्गे, राहुल नष्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीमधील डॉ. अजित पाटील, प्राचार्य महादेव नरके, प्राचार्य अभिजीत मठकर यांनी स्वागत केले. सिनेमाच्या आयोजनासंबंधी दिग्दर्शक सचिन जाधव (९८६०९९६७६८) यांच्याशी संपर्क साधावा.