+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
Screenshot_20240226_195247~2
schedule27 Apr 24 person by visibility 710 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा महाराष्ट्र हा सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. मात्र मतांवर डोळा ठेवून इंडिया आघाडीकडून या सामाजिक न्यायाची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे. संविधानात बदल करुन ओबीसीच्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना देऊ करणारे कर्नाटक मॉडेलची अंमलबजावणी इंडिया आघाडी देशभर करण्याच्या विचारात आहे. सरकार बनाओ आणि नोटा कमाओ हा अजेंडा असलेल्या आणि सामाजिक न्यायाची हत्या करु पाहणाऱ्या इंडिया आघाडीला पराभूत करुन पुन्हा एकदा देशात मोदी सरकार स्थापन करा’असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
महायुतीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मंडलिक व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शनिवारी, कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेत पंतप्रधान मोदी यांनी जवळपास अर्धा तास मतदारांशी संवाद साधला. ‘महायुतीने, कोल्हापूरच्या विकासासाठी अनेक योजना अंमलात आणल्या. बेळगाव-वैभववाडी रेल्वेला मंजुरी दिली, विमान सेवेच्या सुविधा वाढविल्या, रेल्वे सुविधा दिल्या. कोल्हापूरच्या उद्योग, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महायुतीचे उमेदवार मंडलिक व माने यांना विजयी करा’असे आवाहन मोदी यांनी केले.
‘कोल्हापूरकरांना माझा नमस्कार’अशी मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे छत्रपती, राजर्षी शाहू महाराज या महापुरुषांना वंदन केले. करवीर निवासिनी अंबाबाई म्हणजे एक शक्तीपीठ म्हणत प्रणाम केला. ‘कोल्हापूर हे महाराष्ट्रातील फुटबॉल हब आहे. फुटबॉलच्या भाषेत सांगायचे तर निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात आम्ही २ विरुद्ध शून्य गोलफरकांनी पुढे आहोत. निवडणुकीच्या अन्य टप्प्यातही विरोधकांनी चारीमुंडया चित करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.जगात भारी कोल्हापुरी असा गौरवोल्लेख करत त्यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली.
शिवसेना ठाकरे गटावरही मोदी यांनी निशाणा साधला. ते म्हणाले ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली शिवसेना आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेचे शंभर टक्के काँग्रेस झाली आहे. औरंगजेबाला मानणाऱ्या लोकासोबत ठाकरे गेले. हाताला मतदान करा म्हणून ठाकरे पिता-पुत्र आवाहन करत आहेत. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांच्या मनाला यातना झाल्या असत्या.’
काँग्रेसवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, ‘अयोध्येतील राममंदिराची निर्मिती ही देशवासियांची भावना होती. ५०० वर्षांनी हे स्वप्नं साकारले. मात्र अयोध्येतील राममंदिराच्या लोकार्पण सोहळयाचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले. काँग्रेसला सत्तेची स्वप्नं पडत आहेत. काश्मिरमधील ३७० कलम लागू करणं, सीएए कायदा रद्द करण्याचा त्यांचा डाव आहे. इंडिया आघाडीची सत्ता आली तर एका वर्षाला एक पंतप्रधान करण्याचा विचार आहे. मात्र इंडिया आघाडी आणि काँग्रेसचा हा अजेंडा जनता स्वीकारणार नाही. सरकारच्या दरवाजापर्यंतही इंडिया आघाडी पोहचू शकणार नाहीत. विकसित भारतासाठी जनता पुन्हा एकदा मोदी सरकारला निवडून देईल. महायुतीला मतदान म्हणजे विकासाला मतदान. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याची संकल्पना आहे. कोल्हापूरसाठी नवनवीय योजना आणू. वंदे भारत रेल्वे सुरू करू. फिर एक बार मोदी सरकार आणण्यासाठी मंडलिक व माने यांना निवडून द्या. ’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, सदाभाऊ खोत, माजी आमदार सुरेश हाळवणकर, के. पी. पाटील, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, समरजितसिंह घाटगे, शौमिका महाडिक आदी व्यासपीठावर होते.
…………………………………………………………………………………