अभिषेक बोंद्रे, संताजी घोरपडे, प्रसाद जाधवांचा भाजपात प्रवेश
schedule15 Jul 25 person by visibility 192 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवलेले संताजी घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री श्रीपतरव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे यांनीही हाती कमळ घेतला आहे. त्यासह माजी नगरसेवक दिलीप पोवार, उत्तम कोरान यांनी मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपमध्ये दाखल झाले. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरातील एकूण १६ जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे पारडे जड झाले आहे असे भाजपकडून दावा केला जात आहे
मुंबईतील भाजप मुख्यालयात आज कोल्हापुरातील १६ कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्याला किनार आहे. देशात आणि राज्यात भाजप सत्तेवर असताना, विकासासाठी मोठया प्रमाणावर निधी मिळू शकतो. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जनमानसावर करिष्मा टिकून आहे, याची खात्री पटल्याने, भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. कोल्हापुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पोवार आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पवार, शिवाजी पेठेतील प्रमुख कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे नातू अभिषेक बोंद्रे, विधानसभा निवडणूक लढवलेले संताजी घोरपडे आणि सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव यांनी मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार सुधीर गाडगिळ, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, विश्वराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनात्मक बांधणी आणि खर्या कार्यकर्त्याला न्याय देणार्या भाजपमध्ये प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असली तरी कुणावरही अन्याय होवू देणार नाही, अशी भावना नामदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. तर खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची ओळख करून देवून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षाला अधिक ताकद मिळाल्याचे नमुद केले. भाजपच्या विकासाच्या धोरणाला पसंती देवून, कोल्हापुरातील अजुन काही कार्यकर्ते भाजपमध्ये येणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. तर पक्षाची ध्येयधोरणे समजून घ्या, जनहिताच्या कामात अग्रेसर रहा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. रिक्षा संघटनेचे नेते राजेंद्र थोरवडे, वैभव राजेभोसले, सुशांत सावंत, अभिजीत माने, दिपक खांडेकर, मंदार राऊत, संकेत रूद्र, विलास इंदप, देवेश कुबल, सुदर्शन वोरा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.