राजर्षी शाहू महाराजांच्या कारकीर्दीत कोल्हापुरात कुस्ती परंपरा निर्माण –पैलवान संग्राम कांबळे
schedule12 Jan 25 person by visibility 75 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला, खासबागेत कुस्त्यांचे मैदान तयार करून आणि स्थानिक पैलवानांना मदत करत कोल्हापुरात कुस्ती रुजवली. उत्तरेतून नामांकित पैलवान बोलावून कुस्त्यांचे जंगी सामने कोल्हापुरात घडवून आणले. यातून कोल्हापुरात पैलवानकी आणि कुस्तीची परंपरा निर्माण झाली आणि पुढे त्याचा वटवृक्ष झाला. छत्रपती राजाराम महाराज आणि छत्रपती शहाजी महाराजांनीही कुस्तीला सतत प्रोत्साहन दिले आणि ही परंपरा टिकवली. ’ असे मत पैलवान संग्राम कांबळे यांनी व्यक्त केली.
हेरीटेज सोसायटी ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर मेडीकल असोसिएशनतर्फे आणि आठवणीतलं कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'कोल्हापूरची कुस्ती - इतिहास आणि परंपरा' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात व्याख्यान झाले. या व्याख्यानातून पैलवान कांबळे यांनी कोल्हापूरच्या कुस्तीचा दैदीप्यमान व गौरवशाली इतिहास सर्वांसमोर सांगितला.
पैलवान कांबळे म्हणाले, कोल्हापूरने आजवर अनेक नामवंत पैलवान घडवले. बाबासाहेब महाराज आणि छत्रपती चिमासाहेब महाराज यांना कुस्त्यांची अतिशय आवड होती आणि त्यांनी अनेक पैलवान पदरी बाळगलेले होते. स्वातंत्र्योत्तर काळातही ही परंपरा टिकली आणि कोल्हापूरने कुस्तीगीरांच्या पिढ्या मागून पिढ्या घडवल्या. त्यामध्ये कोल्हापूरचे शाहूकालीन पैलवान राजाराम महाराजांच्या काळातील पैलवान निर्माण केलेल्या तालमी आजवरचे झालेले कोल्हापूरचे हिंदकेसरी सर्व महाराष्ट्र केसरी यांची सविस्तर माहिती तसेच यावेळी अनेक जुनी छायाचित्रे, कुस्तीच्या जाहिराती दाखवण्यात आल्या.
१९१३ मध्ये खासबाग मैदानाच्या उदघाटनची कुस्ती रुस्तम ए हिंद इमामबक्ष व रुस्तमै हिंद गुलाम मोहीदिन यांच्यामध्ये झाली होती. ही कुस्ती छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते लावण्यात आली या प्रसंगाची आठवण करून देणाऱ्या एका तैलचित्राचेही अनावरण या प्रसंगी झाले.