माध्यम क्षेत्रातील स्थित्यंतरामुळे न गोंधळता, संधी शोधत कर्तृत्व दाखवा –कुलगुरू डी टी शिर्के
schedule13 Jan 25 person by visibility 191 categoryलाइफस्टाइल
पत्रकार गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव पुरस्कार
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘माध्यम क्षेत्रात झपाटयाने बदल होत आहेत. तंत्रज्ञानाचा अवलंब वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजिन्स) यापुढील काळात महत्वाचे ठरणारे आहे. या स्थित्यंतरामुळे गोंधळून चिंता करण्यापेक्षा, आव्हानांना सामोरे जा. संधी शोधा, नव तंत्रज्ञानाचा स्वीकार करा. पत्रकारितेचे सत्व व तत्व जपत कर्तृत्व दाखवा आणि करिअर घडवा.”असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्के यांनी केले.
कोल्हापूर डिस्ट्रिक रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे पत्रकार पुरस्कार वितरण समारंभ रविवारी (१२ जानेवारी) आयोजित केला होता. या समारंभात पत्रकार गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या समारंभाात जिल्हा व तालुकास्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या १९ पत्रकारांनाही पुरस्कार प्रदान केले. सकाळचे संपादक निखील पंडितराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. बी न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी, घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, शिवाजी विद्यापीठातील परीक्षा विभागाचे माजी संचालक डॉ. बी. एम. हिर्डेकर, साहित्यिक प्राचार्य जी. पी. माळी, रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ झाला. याप्रसंगी असोसिएशनतर्फे ‘जागल्या’या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. प्रा रवींद्र पाटील लिखित ‘निबंधायन’ हे पुस्तक प्रकाशित केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना पंडितराव म्हणाले, ’पत्रकार हा सत्याच्या बाजूने असतो. माध्यम क्षेत्रात नवे बदल होत असले तरी मुद्रित माध्यमांचे महत्व अबाधित आहे.कृत्रिम बुद्धिमत्ता ही मुद्रित माध्यमांना पर्याय नाही तर पूरक आहे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून होणारी पत्रकारिता महत्वाची आहे. गट-तट आणि पक्षीय राजकारणात न अडकता पत्रकार हा बातमीशी बांधिल असतो. ’ताज मुल्लाणी म्हणाले, ‘माध्यमात काम करत असताना वेळ, काळाचे बंधन नसते. यामुळे बातमीदारांनी कायम सजग असले पाहिजे. आरोग्य सांभाळले पाहिजे. मुलांच्या शिक्षणावर फोकस ठेवला पाहिजे. महत्वाचे म्हणजे निर्व्यसनी राहा.’ पत्रकारासाठी काम करणाऱ्या असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांना पत्रकार महामंडळावर संचालक म्हणून स्थान मिळावे अशी अपेक्षाही मुल्लाणी यांनी व्यक्त केली.
रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव सुरेश पाटील यांनी अहवाल वाचन केले. पूनम चौगुले व अतुल मंडपे यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी यांनी आभार मानले. असोसिएशनचे खजानिस सदानंद कुलकर्णी, सतीश पाटील, दगडू माने, भास्कर चंदनशिवे, निवास वरपे, प्रकाश तिराळे, अवधूत आठवले, सागर लोहार, दिलीप पाटील, विवेक दिंडे, सुहास जाधव, संतोष बामणे आदी उपस्थित होते.
……………..
जिल्हास्तरीय-तालुकास्तरीय पुरस्कारप्राप्त पत्रकार
पत्रकार संतोष मिठारी, ज्ञानेश्वर साळुंखे, अशोक पाटील यांना जिल्हास्तरीय पुरस्कार दिला. धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा पुरस्कार, दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कर, शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मिडिया पुरस्कार देण्यात आला. तालुकास्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांनी बाजीराव सुतार, सचिनकुमार शिंदे, सचिन बाबासो पाटील, शकील इमाम सुतार, सरदार, हिंदुराव चौगुले, नंदकुमार बुराण, प्रकाश कारंडे, एकनाथ आप्पासो पाटील, तात्यासाहेब रामचंद्र कदम, संजय मारुती कुट्रे, संभाजी शामराव निकम, भिमराव महादेव पाटील, शिवकुमार प्रकाश संसुदी, सुभाष इंगळे, जमीर पठाण, शिवाजी खतकर, संदीप दळवी, रवींद्र येसादे, संतोष साखरीकर यांचा सन्मान झाला.