यु-डायस प्रणालीत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हयाचा गौरव, दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा पुण्यात सन्मान !!
schedule13 Jan 25 person by visibility 638 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हयाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनचे काम ९७.८९ टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्य प्रकल्प संचालिका श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हयाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन्मानपत्रांनी गौरव करण्यात आला. हॉटेल ऑर्कीड, बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेत हा सन्मान करण्यात आला.
केंद्र व राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये राज्यातील मान्यता प्राप्त शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यतच्या विद्यार्थ्याची सविस्तर माहिती संगणकीकृत केली जाते. विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या सरकारी योजनेच्या लाभासाठी ग्राहय धरण्यात येते. विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन पूर्ण असलेल्या निकषावरच शाळांना शिक्षक मान्य होतात. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विदयार्थी व शिक्षक हिताच्या दृष्टीने विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन कामाकाजास प्राधान्य दिले आहे.
तसेच या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्हयातील उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर घन:श्याम पुरेकर तसेच तालुकास्तरावरील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, एमआयएस कॉ-ऑडीनेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर असे सर्वाचे सन्मानपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. या कामकाजासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कार्तिकेयन. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.