वसा सामाजिक कार्याचा, ध्यास कागलच्या विकासाचा
schedule26 Nov 25 person by visibility 9 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माने घराण्याचा विकासाचा वसा लाभलेल्या सविता प्रल्हाद माने या कागल नगरपालिका निवडणुकीत ‘घरोघरी विकासाचे तोरण..... हेच माझे धोरण....." या भूमिकेतून उतरल्या आहते. त्या, कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. माने घराण्याचा सामाजिक कार्याचा वारसा, मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे गटाची आघाडी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व पती प्रल्हाद माने यांचे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील संपर्क या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरत आहेत.
राजकीयदृष्टया जागरुक शहर म्हणून कागलची ओळख. गटातटाच्या राजकारणासाठी हा तालुका प्रसिद्ध. नगरपालिकेची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. या निवडणुकीत राजकीय वैर बाजूला सारुन मंत्री मुश्रीफ व शाहू ग्रुपचे प्रमुख घाटगे हे एकत्र आले आहेत. या आघाडीतर्फे सविता माने या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. नगरपालिका क्षेत्रात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रात संपर्क मेळावा होत आहेत. वैयक्तिक संपर्कावर भर आहे. .शिक्षण क्षेत्रातील अनुभव आणि साऱ्यांचा विश्वास पाठीशी घेवून त्या नवी वाटचाल करत आहेत. प्रचार संपर्क दौऱ्यात त्या म्हणाल्या, 'नगराध्यक्षपद हे प्रतिष्ठेचे आहे, शहर विकासाच्या विविध कामांची अंमलबजावणीची जबाबदारी त्यांच्याकडे असते. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून मला संधी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व छत्रपती शाहू आघाडी या संयुक्त युतीमार्फत माझ्यासारख्या माने घराण्याचा सामाजिक वारसा लाभलेल्या महिलेला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत सन्मान मिळतोय, ही गर्वाची आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा ऐतिहासिक क्षण आहे. म्हणूनच माझ्या नजरेतील कागल शहराच्या सौंदर्यात भर टाकताना अनेक व्हिजन डोळयांसमोर आहेत. कागल नगरपालिकेतर्फे महिला सक्षमीकरण प्रकल्प प्रभावीपणे राबविणे, नगरपालिकेचे स्वतैचे शिक्षण मंडळ स्थापन करून शहरातील सर्व शाळांमधून भौतिक सोयी-सुविधांबरोबरच दर्जेदार आणि गुणवत्त शिक्षण मिळवून देण्यासाठी कटिद्ध राहीन. तसेच कागल शहराचा झपाटयाने विस्तार होत आहे. यामुळे शहराची सुरक्षितता जपणे हे महत्वाचे आहे. यासाठी संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणाखाली आणले जाईल.’अशा शब्दांत त्या विकासात्मक कामाची भूमिका मांडतात.