प्रारुप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
schedule25 Nov 25 person by visibility 22 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील महानगरपालिकांमध्ये प्रारूप मतदार याद्या प्रभागनिहाय योग्य पध्दतीने फोडलेल्या नाहीत. बऱ्याच मतदारांची नावे राहत असलेल्या प्रभागांतून इतर प्रभागांमध्ये गेली आहेत. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांच्या हरकतीची मुदत १५ दिवसांनी वाढवा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील व विधिमंडळातील काँग्रेसचे पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. मतदार याद्यांबाबत स्पष्टता व पारदर्शकता येण्यासाठी राजकीय पक्षांच्या व प्रत्येक नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेणे आवश्यक आहे. प्रभागातील नागरिकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या मतदार याद्या तपासण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे प्रारूप मतदार याद्यांवर हरकत व सूचना घेण्यासाठी मुदत वाढविण्याची आवश्यकता असून ती १५ दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी करण्यात आली.