आगामी काळात लष्करामध्ये महिलाराज : कर्नल हेमंत जोशी
schedule25 Nov 25 person by visibility 29 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भारतीय सैन्यामध्ये मुलींना असंख्य संधी आहेत. त्या लष्करात मोठी कामगिरी बजावतील. ’सध्या सैन्यामध्ये मुलींसाठी उपलब्ध जागा कमी असल्या तरी भविष्यात यामध्ये वेगात वाढ होऊन इतर सर्व क्षेत्राप्रमाणे लष्करात देखील महिलाराज येईल.’ असा विश्वास अखिल भारतीय पुर्वसैनिक सेवा परिषद सांगलीचे अध्यक्ष, निवृत्त कर्नल हेमंत जोशी यांनी व्यक्त केला.
राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रेरणास्त्रोत शहीद सिताराम गोपाळा पाटील यांचा स्मृतिदिन ‘शहीद सन्मान दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. १९७१ च्या बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात त्यांनी देशासाठी बलिदान दिले होते. यानिमित्ताने ‘मुलींना भारतीय लष्करातील संधी’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील होत्या. संस्थेचे मुख्य मार्गदर्शक डॉ जगन्नाथ पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पाटील म्हणाले, ‘गेल्या काही वर्षात महिलांसाठी लष्करामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत. कोल्हापूरला आणि महाराष्ट्राला महिलांच्या शौर्याचा वारसा आहे. आपला भाग हा हिरकणींचा आणि रणरागिणींचा आहे.. म्हणून सैन्य दलामध्ये विद्यार्थिनी नक्कीच चांगलं करियर करू शकतील. या दृष्टीने शहीद संस्था प्रयत्नशील आहे.’ शहीद सन्मान दिनानिमित्त जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा, शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात आल्या. शाहीर सिकंदर यांच्या शाहिरी गाण्याच्या कार्यक्रमातून महापुरुष आणि शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा मिळाला. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी सैनिक संघटनेचे प्रतिनिधी नाईक आण्णासाहेब कुंभार, नाईक रविकांत उपाध्ये, विलास पाटील, रंगराव देसाई, शहीद शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. सुनील पाटील, अनिल पाटील, दिलीप देसाई, प्रा. हिमांशू चव्हाण उपस्थित होते.