ही मॅन धर्मेंद्र यांचे कलापूरशी नाते, कोल्हापुरी पाहुणचाराने भारावले होते
schedule25 Nov 25 person by visibility 90 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हिंदी सिनेसृष्टीतींल ही मॅन म्हणून रसिकांच्या मनावर राज्य केलेल्या अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाने त्यांच्या कोल्हापूरशी निगडीत आठवणींना उजाळा मिळाला. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनी त्यांच्यासोबतच्या स्मृती जागविल्या. धर्मेंद्र यांनी विविध कार्यक्रमानिमित्त तीन वेळेला कोल्हापूरला भेट दिली होती. एका कार्यक्रमात त्यांनी यासंबंधीच्या आठवणी जागविल्या होत्या. महाराष्ट्राने माझ्यावर भरभरुन प्रेम केले तसेच या भूमीने मला प्रसिद्धी दिली, ऐश्वर्य दिले अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात व्यक्त केली होती. कोल्हापुरी पाहुणचाराने भारावून गेले होते. दरम्यान कोल्हापुरात धर्मेंद्र यांच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या दुकानाला धरमजी असे नाव ठेवले आहे.
संगीतकार अरविंद पोवार कला अकादमीच्या चाळीसाव्या वर्धापनदिनानिमित्त अभिनेता धर्मेंद्र यांचा खास सत्कार करण्यात आला होता. माजी राज्यपाल डॉ डी. वाय. पाटील, भैय्यूजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला होता. कोल्हापुरी फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. १२ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या या कार्यक्रमात बोलताना धर्मेद्र यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूंचे दर्शन प्रेक्षकांना घडले होते. ‘महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांनी माझ्यावर जे प्रेम केले आहे, माझ्यादृष्टीने ते खूप मोलाचे आहे.’अशी भावना व्यक्त केली. पूर्वी मी, एकदा बेंगलूरला जाताना काही वेळ कोल्हापुरात थांबले होतो.तसेच एकदा कबड्डी सामन्यावेळी आल्याचेही त्यांनी सांगितले.
डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांच्याशीही त्यांचा स्नेह होता. डॉ. संजय पाटील म्हणाले, ‘धर्मेंद्र हे अभिनेते म्हणून जितके मोठे होते तितकेच त्यांचे व्यक्तिमत्वही मोठे होते. हा ग्रेट माणूस होता. मोठे यश संपादन करुनही त्यांच्यामध्ये मीपणा, अंहभाव नव्हता. पडद्यावर डॅशिंग भूमिका साकारणारे धमेंद्र हे अतिशय नम्र स्वभावाचे होते. कोल्हापुरातील नॉन व्हेज फूड त्यांना खूप आवडायचे.’ दरम्यान आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 2013 मध्ये कोल्हापुरात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे ही स्पर्धा झाली होती. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी अभिनेते धर्मेंद्र कोल्हापुरात आले होते. या स्पर्धेतील विजेते संघाला आमदार पाटील यांच्याकडून दुबई सहलीचे आयोजन केले होते.