देणाऱ्यांचे हात हजारो ! पूरग्रस्तांच्यासाठी काँग्रेस कमिटीकडे मदतीचा ओघ !!
schedule27 Sep 25 person by visibility 128 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "देणाऱ्यांचे हात हजारो," याची प्रचिती सध्या कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये पहावयास मिळत आहे. सोलापूर व मराठवाडा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हाक दिली. त्यांच्या या हाकेला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून विविध स्वरूपाची मदत काँग्रेस कमिटीमध्ये जमा होत आहे. " काँग्रेस कमिटीकडे जमलेली संपूर्ण मदत पुरग्रस्त जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांनी दिली. अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत ही मदत संकलित केली जाणार आहे. जमलेल्या साहित्याचे किट तयार करून ते पूरग्रस्त भागात वितरित केले जाणार आहेत.
" हाक काँग्रेसची, कोल्हापूरकरानो मराठवाड्याला साथ देऊ या" अशी साद आमदार पाटील यांनी दिली होती. 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत जीवनावश्यक वस्तू, कपडे व विविध प्रकारचे साहित्य काँग्रेस कमिटीत जमा करण्याचे आवाहन केले. त्यानुसार समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. तांदूळ, साखर, गहू, चटणी, साबण, बिस्कीट, ब्लॅंकेट, कपडे... प्रत्येक जण आपापल्यापरीने आपापल्या पद्धतीने मदत जमा करत आहे. काहींनी तांदळाच्या पिशव्या दिल्या. काहींनी गहू दिले, कोणी तांदूळ तर कोणी प्रापंचिक साहित्य दिले. हे सगळे साहित्य व्यवस्थितरित्या पॅकिंग करून पूरग्रस्तांच्या हवाली करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना मदत करण्यात शाळकरी मुले आणि आयटीमधील विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. अनेक शाळकरी मुलांनी शालेय साहित्य जमा केले आहे. तसेच आयटीमध्ये काम करणाऱ्या बारा मुलींनी एकत्र येऊन तांदूळ व इतर धान्य दिले. सोलापूर, मराठवाडा भागात यंदा अतिवृष्टी झाली. शेती, पिके, घर, जनावरे वाहून गेली. या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक पुढे येत असल्याचे चित्र कोल्हापुरात पहावयास मिळत असल्याचे लाटकर यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील विविध प्रभागातून मोठ्या प्रमाणात मदत जमा झाल्याचे माजी नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, बाजार समितीचे माजी संचालक दशरथ माने, माजी नगरसेवक कैलास गौडगाब, महेश जाधव, सागर येवलुजे, धीरज पाटील, नंदकुमार पिसे, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, पाचगाव कोअर कमिटीचे अध्यक्ष नारायण गाडगीळ, पाचगाव ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, संग्राम पोवाळकर, अनिरुद्ध भुरके आदी उपस्थित होते.
काँग्रेस कमिटीकडे काहींनी वस्तूंचे तयार किट दिले. तर जमलेल्या साहित्याचे किट तयार करण्यात येत आहेत. विद्यानंद पोळ, संजय पोवार, रोहित पाटील, श्रीकांत चव्हाण, बाबूराव कांबळे आदी परिश्रम घेत आहेत