दहा हजार जातिवंत म्हैशी जिल्ह्यात आणू या ! २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठू -मंत्री हसन मुश्रीफ
schedule04 Oct 25 person by visibility 49 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळच्या दुधाची गुणवत्ता, चव आणि शुद्धता यामुळेच आज राज्यभर गोकुळच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. पुणे-मुंबईसह इतर महानगरांतील ग्राहक नेहमी सांगतात गोकुळच्या म्हैस दुधाचा दर्जा इतर म्हैस दूधापेक्षा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या दर्जाचा सन्मान राखत अधिक उत्पादन आणि पुरवठा वाढवणे आपली सामूहिक जबाबदारी असून सर्वांच्या सहकाऱ्याने गोकुळचे म्हैस दूध उत्पादन वाढवून २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा गाठणार. पुढील एक-दोन वर्षांत परराज्यातील १० हजार जातिवंत म्हैशी गोकुळच्या माध्यमातून जिल्ह्यात आणण्याचा मानस आहे.” असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
गोकुळ दूध संघाच्यावतीने सुपरवायझर, महिला स्वयंसेविका तसेच सर्व विभाग प्रमुख यांची बैठक ताराबाई पार्क येथील गोकुळ कार्यालयात पार पडली. याप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी सुपरवायझर हे गोकुळ आणि दूध उत्पादक यांच्यातील मुख्य दुवा आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील अल्पभूधारक व शेतमजूर वर्गातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहन द्यावे. सीमाभागातील म्हैस दूध संकलन वाढवण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, तसेच प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सुपरवायझरचा ‘लाडका सुपरवायझर’ म्हणून गौरव केला जाईल,’ अशी घोषणा मुश्रीफ यांनी केली.
चेअरमन नविद मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. संचालक किसन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व केडीडीसीसी बँकेचे कार्यकारी संचालक गोरख शिंदे यांनी संघामार्फत व बँकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या “म्हैस खरेदी योजने”बद्दल सविस्तर माहिती दिली. संचालक रणजितसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक विश्वास पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी आमदार राजेश पाटील, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर उपस्थित होते.