शिवाजी विद्यापीठाच्या आयडिया लॅबसाठी मेनन समूहाकडून पन्नास लाखाचा निधी
schedule04 Oct 25 person by visibility 224 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई.)- ‘आयडिया लॅब’ (आयडिया डेव्हलपमेंट, इव्हॅल्युएशन अँड एप्लीकेशन लॅब) स्थापित करण्यासाठी येथील मेनन समुहातर्फे सामाजिक दायित्व निधी (सी एस आर) अंतर्गत ५० लाख रुपयांच्या भरीव निधीचा धनादेश आज मेनन समुहाचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक सचिन मेनन यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला.
यावेळी सचिन मेनन म्हणाले, शिवाजी विद्यापीठ हे असे ठिकाण आहे, जिथे तरुण मने घडवली जातात. उद्योग जगतातील लोक म्हणून आम्ही व्यवसायासाठी योग्य परिसंस्था तयार करू शकतो, परंतु खरी शैक्षणिक आणि विषयानुषंगिक जडणघडण फक्त विद्यापीठच करू शकते. स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून बाहेर पडणारे विद्यार्थी उद्योग क्षेत्राशी थेट जुळवून घेऊ शकतील, तसेच उद्योग जगतातील घडामोडींचा अचूक वेध घेऊ शकतील, या दृष्टीने आयडिया लॅब अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे. ही लॅब या भागातील सर्वाधिक गुणवत्तापूर्ण होण्याकरिता मेनन समूह सदैव विद्यापीठासोबत राहील.
कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आयडिया लॅबसाठी इतका भरीव निधी प्रदान करून विद्यापीठाप्रती जो विश्वास दर्शविला, त्याबद्दल मेनन समूहाला धन्यवाद दिले. स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी प्रास्ताविक केले. आयडिया लॅब समन्वयक डॉ. पी. डी. पाटील यांनी आयडिया लॅबची उद्दिष्टे, प्रस्तावित सुविधा तसेच ध्येयधोरणे यांची माहिती दिली. लॅबचे सह-समन्वयक डॉ. एस. बी. चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यक्रमास प्र- कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेसचे संचालक डॉ. एस. डी. डेळेकर, क्वालिटी ऑफिसर सुभाष माने, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिलचे हर्षवर्धन पंडित उपस्थित होते. मेनन समुहातर्फे कार्यकारी संचालक शरण्या मेनन, देविका मेनन, निवेदिता मेनन, समूहाचे प्रेसिडेंट आर. डी. दीक्षित, व्हाईस प्रेसिडेंट अमित देशपांडे व मिलींद धोपेश्वरकर, प्रमोद सूर्यवंशी, अनिल पुरोहित, योगेश देशमुख उपस्थित होते.