२०१३ पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीमधून सवलतीसाठी सरकार सकारात्मक- शिक्षणमंत्री दादा भुसे
schedule16 Sep 25 person by visibility 175 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २०१३ पूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेले शिक्षकांना टी.ई.टी. परीक्षेतून सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. याबाबत केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री भुसे यांची भेट घेतली. टीईटी परीक्षा अनिवार्य करणे चुकीचे असल्याचे सांगितले. तसेच संघटनेच्या मागणीनुसार शंभर टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले.
संघटनेने, यावेळी बी.एल.ओ.च्या कामाचा शिक्षकांना प्रचंड त्रास होत असून हे फक्त शिक्षकाला दिले जाते बाकी कर्मचाऱ्यांना वगळले जात आहे हा मुद्दा मांडला त्यावर मंत्री भुसे यांनी निवडणूक आयोगाकडे शिक्षकांकडील हे काम कमी करण्यासाठी चर्चा करू असे सांगितले. शिक्षण सेवक पद रद्द करावे, जिल्हा परिषद सर्वच शाळांना शंभर पटास मुख्याध्यापक पद मंजूर व्हावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पाचवी व आठवी चे वर्ग विना अट जोडावेत, कार्यरत शंभर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी यासह विविध मागण्यासंबंधी चर्चा केली. शिष्टमंडळात राज्य कोषाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्य संघटक पी.आर . पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस के.पाटील, वाशिम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, प्रदीप गावंडे, भाऊराव शिंदे, प्रमोद मुक्केमवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिराम येळणे, अमरावती कार्याध्यक्ष गोकुळ चारथळ, नितीन पेंढेकर, विजय सावळे उपस्थित होते.