अभाविपचे विद्यापीठात आंदोलन, काही कार्यकर्ते कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले
schedule15 Sep 25 person by visibility 89 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर शाखेकडून सोमवारी (१५ सप्टेंबर) शिवाजी विद्यापीठात आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासाठ आंदोलन पुकारले होते. आंदोलनादरम्यान अभाविपचे काही कार्यकर्ते कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले. त्या ठिकाणी घोषणा देत ठिय्या मारला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाहेर काढले.
दरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे प्रमुख डॉ. टी. एम. चौगुले, शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड.स्वागत परुळेकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना लिखित स्वरूपात मागणीची पूर्तता करण्यासंबंधी आश्वस्त केले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संयोजक दीपक नडमाने, जिल्हा संयोजक वेदांत कुलकर्णी, महानगरमंत्री ऋषिकेश थोरात, जिल्हा सहसंयोजक प्रेम राजमाने होते.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत दिली जाणारी विद्यार्थी, पालक, शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी कल्याण निधी योजना प्रतिवर्षी कार्यान्वित आहे. या अंतर्गत पालकांचा नैसर्गिक किंवा अकस्मित मृत्यूसाठी विद्यार्थ्यांना रितसर अर्ज केलेल्या व मंजुरी मिळालेल्या विद्यार्थ्यांना कल्याण निधीचा लाभ घेता येतो. परंतु शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या कालखंडात जवळपास ५९ विद्यार्थ्यांना विद्यार्थी कल्याण निधी पासून वंचित राहावे लागले. विद्यापीठाने तात्काळ विद्यार्थी कल्याण निधी मंजुरीचे पत्र काढून तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अभाविपने केली होती. विद्यापीठातील मुलांच्या वसतीगृहमध्ये जिमखान्याचे उद्घाटन होऊनही विद्यार्थ्यांच्यासाठी खुला केला नव्हता. यासंदर्भात मागणी केल्यावर जिमखाना सुरू केला गेला पण व्यायामाचे साहित्य काही प्रमाणात खराब झाल्याचे अभाविपने म्हटले आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षाला स न जवळपास चार महिने होऊनही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्र मिळालेली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये संदर्भ पुस्तक मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. या विद्यार्थ्यांना ओळखपत्र उपलब्ध व्हावे अशी मागणी केली होती. या साऱ्या विषयाच्या सोडवणुकीसाठी अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठात पोहोचले. दरम्यान त्यांना समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. काही जण कुलगुरूंच्या केबिनमध्ये घुसले.