देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार हे स्वराज्य- सुराज्याच्या घडणीचे शिल्पकार :जिल्हाधिकारी अमोल येडगे
schedule16 Sep 25 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘थोर स्वातंत्र्यसेनानी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व केले .त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत आंदोलन आणि संस्थानांचे विलीनीकरण झाले. भारतीय संविधान सभेचे ते सदस्य होते. स्वातंत्र्योत्तर काळात सहकार, शिक्षण,कृषी, औद्योगीकरण, ग्रामीण विकास, हरितक्रांती अशा अनेक माध्यमातून त्यांनी समाज आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्य आणि सुराज्यासाठी वेचले. ते स्वराज्य आणि सुराज्याच्या घडणीचे शिल्पकार होते. त्यांचे कार्य आणि विचार हे येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.’ असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले.
कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालित शहाजी लॉ कॉलेज, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, नाइट कॉलेज आणि पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंग यांच्या वतीने आयोजित देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११६ वी जयंती आणि राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्ष रजनी मगदूम, उपाध्यक्ष डॉ प्रसाद मगदूम, संचालक ॲड .वैभव पेडणेकर, ॲड अमित बाडकर हे उपस्थित होते. यावेळी डॉ विश्वास सुतार लिखित कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या संस्थागीताचे जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते अनावरण करण्यात आले.
कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ.विश्वनाथ मगदूम यांनी संस्थेच्या वाटचालीचा व विविध उपक्रमांचा आढावा घेतला. कौन्सिल ऑफ एज्युकेशन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व बदलत्या संदर्भांचा विचार करून सतत काळाबरोबर संवादी राहून आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. इरफान शेख (औरंगाबाद, प्रथम क्रमांक), मधुरा आमने, (कोल्हापूर,,द्वितीय क्रमांक), तेजस पाटील (पुणे, तृतीय क्रमांक ) ऋतुजा पोवार (इचलकरंजी ,चतुर्थ क्रमांक ) व अक्षय जहागीरदार (कोल्हापूर, पाचवा क्रमांक ) यांना वाणीरत्न चषक, प्रमाणपत्र आणि रोख रकमेची पारितोषिके दिली. प्राचार्य डॉ .उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा डॉ .अरुण शिंदे यानी सूत्रसंचालन केले. प्राचार्या डॉ .वर्षा मैंदर्गी यांनी आभार केले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. प्रवीण पाटील, प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते .