वंदूरच्या पाटील बंधूचा सेंद्रीय गूळ उद्योग ! परराज्यातही पसरला गोडवा, शंभर रुपये किलोने विक्री !
schedule15 Sep 25 person by visibility 61 categoryउद्योग

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर हे गुळासाठी प्रसिद्ध. कोल्हापुरी ब्रँडच्या गुळाला सर्वत्र मागणी. पारंपरिक पद्धतीने गुळ बनविण्याची प्रक्रिया चालू ठेवत, त्याला जीआय मानांकन मिळवत कागल तालुक्यातील मौजे वंदूर येथील पाटील बंधूंनी शंभर टक्के सेंद्रीय व केमिकल विरहीत गूळ व काकवी उत्पादनात नावलौकिक मिळवला आहे. ‘शक्ती’ नावांनी त्यांनी ही उत्पादने तयार केली आहेत. सेंद्रीय गुळाची बाजारपेठेत शंभर किलो प्रतिकिलो या दराने विक्री होते. पाटील बंधू गूळ उद्योगाची सेंद्रीय व केमिकल विरहीत या उत्पादनांना परराज्यातूनही मागणी आहे. गुजरात, उत्तरप्रदेशसह वेगवेगळया राज्यात विक्री होते.
पाच किलो, एक किलो, अर्धा किलो, पाव किलो वजनात गुळ उपलब्ध आहे. शिवाय मोदक व वडीच्या आकारात आकर्षक पॅकिंगमध्ये गुळाची विक्री होते. एक लिटर व पाचशे मिलि लिटरमध्ये काकवी बॉटल आहेत. पाचही भावंडे शेती व्यवसायात. ऊस पीकाची लागवड करतात.पाटील बंधू हे १९९९ मध्ये सेंद्रीय शेतीकडे वळले. पाटील कुटुंबीयांची जवळपास ४५ एकर शेती. उपलब्ध शेतीपैकी जवळपास पाच एकर शेतीत सेंद्रीय गुळासाठी ऊसाची लागवड करतात. एकरी पन्नास टन ऊस उत्पादन घेतात. त्यातून चार ते पाच टन गूळ निर्मिती करतात.
पाच भावंडापैकी बाळासाहेब गणपती पाटील हे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. पहिल्यांदाच ते बाजार समितीवर संचालक म्हणून निवडून आले. तत्पूर्वी गूळ उत्पादक, विक्रेते या नात्याने गेली पंचवीस वर्षे ते बाजार समितीशी निगडीत आहेत. सेंद्रीय व केमिकल विरहित गूळ निर्मितीविषयी सांगताना बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर ही गुळासाठी प्रसिद्ध आहे. पारपंरिक व गुणवत्तापूर्ण गुळाचे उत्पादन केले पाहिजे म्हणून सेंद्रिय गुळ निर्मितीकडे वळलो. जीआय मानांकन घेतले. गुळामध्ये सात अन्नघटक आहेत. गूळ हे पौष्टिक आहे. शरीरात जादा कॅलरीज निर्मितीसाठी व शरीराच्या निकोप वाढीसाठी गूळ उपयुक्त आहे. महत्वाचे म्हणजे गुळामुळे अन्नाची चव व गोडी वाढते. यामुळे पूर्णत: नैसर्गिक गुळाची निर्मिती करायची. सेंद्रीय व केमिलक विरहित गुळ तयार करुन विक्री सुरू केली. त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.’
सेंद्रीय व केमिकल विरहीत गुळाला दर ही जादा मिळतो. प्रतिकिलो शंभर रुपये किलो दराने विक्री होते. मार्केटिंग कौशल्ये आत्मसात करुन विक्री केल्यास शेतकऱ्यांना जादा उत्पन्न मिळते. तेव्हा शेतकऱ्यांनी सेंद्रीय गूळ निर्मितीकडे वळावे. गुणवत्तापूर्ण गूळ तयार केला पाहिजे.’अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.