जिल्ह्यात सतरा सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा पंधरवडा –सीईओ कार्तिकेयन एस
schedule16 Sep 25 person by visibility 109 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन टप्पा-2 अंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित केला जातो. २०१७ पासुन सुरु असलेला हा उपक्रम स्वयंसेवी वृत्ती आणि सामूहिक कृतीला चालना देण्यासाठी महत्वाचा ठरला आहे. यंदाही हा पंधरवडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छोत्सव या संकल्पनेनुसार साजरा करण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार, स्वच्छता ही सेवा २०२५ हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविला जाणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व नागरिक, संस्था, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट तसेच विविध विभागांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. या पंधरवड्या दरम्यान प्रमुख उपक्रमांतर्गत अस्वच्छ ठिकाणांची निवड करुन साफसफाई करणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सफाईमित्र सुरक्षा शिबिरे, पर्यावरणपूरक व शून्य कचरा उत्सव, स्वच्छ सुजल गाव संकल्पनेशी निगडित प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच या कालावधीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करुन हागणदारीमुक्त अधिक मॉडेल गाव व स्वच्छ सुजल गाव घोषित करण्याचे उद्दिष्ट आहे. २५ सप्टेंबर रोजी एक दिवस-एक तास-एक सोबत या संकल्पनेतून देशव्यापी श्रमदान आयोजित करण्यात आले आहे. स्वच्छता ही सेवा 2025 मधील सर्व उपक्रम केंद्र शासनाच्या विशेष तयार केलेल्या IT पोर्टलवर (https://swachhatahiseva.gov.in/) अपलोड करण्याची सुविधा असल्यामुळे जिल्ह्यात राबविण्यात येणा-या सर्व उपक्रमांचे याद्वारे शासन स्तरावरुन सनियत्रंण केल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेमार्फत देण्यात आली आहे.