मजूर सहकारी संस्थेत दहा संचालकांचे बंड !! चेअरमनांच्याविरोधात थोपटले दंड !!
schedule23 Sep 25 person by visibility 207 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अडीच – तीन वर्षापूर्वी तत्कालिन सत्ताधाऱ्यांना पराभूत करुन सत्तेवर आलेल्या कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेत विद्यमान संचालक मंडळात मतभेद निर्माण झाले आहेत. मजूर सहकारी संस्थेचे चेअरमन प्रमोद पोवार व माजी चेअरमन मुकुंद पोवार यांच्यावर मनमानी व एकाधिकारशाही कारभाराचा आरोप करत सत्ताधारी संचालक मंडळातील दहा संचालकांनी मंगळवारी (२३ सप्टेंबर २०२५) पदाचा राजीनामा दिला. जिल्हा सहकारी उपनिबंधकांच्याकडे या दहा संचालकांनी सामूहिकरित्या राजीनामे सादर केले. या घडामोडीवरुन मजूर सहकारी संस्थेतील राजकारण व अंतर्गत कारभार चव्हाटयावर आला.
राजीनामा दिलेल्या संचालकांमध्ये शाहू लक्ष्मण काटकर, जयहिंद विष्णू तोडकर, जयसिंग आनंदराव पाटील, तुकाराम धोंडीराम पाटील, उषा महादेव पाटल, किर्ती राजेश मोरे, वसुंधरा वसंत पाटील, पद्मजा सुभाष कदम, युवराज रघुनाथ पाटील, तानाजी बाळू पोवार यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्हा मजूर सहकारी संस्थेची निवडणूक २०२२ मध्ये झाली होती. त्या निवडणुकीत मजूर सहकारी संस्थेत सत्तापरिवर्तन झाले. सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने पंधरापैकी चौदा जागा जिंकल्या. मात्र गेले काही दिवस मजूर सहकारी संस्थेत सत्ताधारी संचालक मंडळात धुसफूस वाढली होती. सत्ताधारी संचालकांतील मतभेदाचा मंगळवारी स्फोट झाला.
दहा संचालक एकत्र येत त्यांनी, सहकारी संस्था जिल्हा सहनिबंधक यांच्याकडे सामूहिक राजीनामे दिले. या दहा संचालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘‘मागील काही काळापासून संघाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. संचालकानी संघाच्या हिताची सूचना केल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे, संचालक मंडळाला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, अनावश्यक खर्च करणे, संचालकानी सभेमध्ये संचालकांना बोलण्याची संधी न देणे, आपल्या मर्जीतील काही निवडक संस्थांना कामाची शिफारस करणे. असे प्रकार सुरू आहेत.
“संघासाठी सभासद म्हणून गरज नसताना खाण मजूर संस्थांची नोंदणी करणे, त्यामध्ये अनावश्यक खर्च लादणे, बेकायदेशीर पद्धतीने निमंत्रित संचालकांची नियुक्ती करणे, उपविधी मंजूर करून बेकायदेशीर चार संचालकांची नियुक्ती करणे, गरज नसताना नोकरभरती करणे, थकबाकीदार संस्थांना काम वाटप करुन संस्थेच्या हिताला बाधा आणणे अशा अनेक बाबी आमच्या निदर्शनास आल्या. संघाच्या अस्तित्वाला आणि आर्थिक शिस्तीला धोका निर्माण करणारा हा कारभार आम्हाला मान्य नाही. चेअरमन प्रमोद पोवार व माजी चेअरमन मुकुंद पोवार यांचा मनमानी कारभार सुरू आहे. या साऱ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन मजूर सहकारी संघावर प्रशासकाची नियुक्ती करावी.”
- शाहू काटकर, संचालक मजूर सहकारी संस्था