कोल्हापूर जिल्ह्यात पाच डिसेंबरला शाळा बंद आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
schedule28 Nov 25 person by visibility 118 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ सरसकट लागू केलेली टीईटी परीक्षा रद्द करावी, संच मान्यतेचा पंधरा मार्च २०२४ चा आदेश रद्द करावा, शिक्षण सेवक पद रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी पाच डिसेंबर २०२५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आम.जयंत आसगावकर यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, खाजगी उच्च माध्यमिक, माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटना व महापालिका शिक्षक संघटटना प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी (२८ नोव्हेंबर २०२५) मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे झाली. शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी.लाड हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
पाच डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता दसरा चौक या ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात उतरावे असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांनी संयुक्तपणे केले. या बैठकीत टीईटी परीक्षेत संदर्भात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते पण प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही, पंधरा मार्चच्या संचमान्यतेच्या आदेशामुळे राज्यातील शिक्षक अतिरिक्त होत असल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर शिक्षण सेवक पद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांवर आज झालेल्या संघटना बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला शिक्षक संघटनांचे नेते दादा लाड, प्रसाद पाटील, भरत रसाळे, बाबा पाटील, सुधाकर सावंत, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे प्रमोद तोंदकर, जोतिराम पाटील, शिक्षक संघ थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, शिक्षक संघ माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाचे जिल्हाध्यक्ष बबन केकरे, जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे, शिक्षक परिषदेचे उदय पाटील, पदवीधर शिक्षक संघटनेचे सुकुमार पाटील, माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक, शिक्षक भरतीचे गजानन कांबळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे डी. वाय. कांबळे, सुधाकर निर्मळे, विलास पिंगळे, उमेश देसाई, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, मिलिंद तोडकर, संजय देमाण्णा, बाबासाहेब पाटील, आदी उपस्थित होते.