कृषी प्रदर्शनात गोकुळचा स्टॉल ! दुग्धजन्य पदार्थ, आयुर्वेदिक उत्पादने - वैरण बँक ! !
schedule28 Nov 25 person by visibility 35 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तपोवन मैदान येथे पाच ते आठ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित सतेज कृषी प्रदर्शनात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा स्टॉल असणार आहे. या स्टॉलच्या माध्यमातून गोकुळची दूध उत्पादकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. तसेच गोकुळची दुग्धजन्य पदार्थ, जनावरांसाठीच आयुर्वेदिक औषधे व वैरण उत्पादने उपलब्ध असतील. अशी माहिती मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील व पशुसंर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे यांनी दिली.
सतेज कृषी प्रदर्शनासंबंधी माहिती देण्यासाठी माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी (२७ नोव्हेंबर २०२५) पत्रकार परिषद झाली. यावेळी या प्रदर्शनाचे प्रायोजक, सहभागी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रदर्शनाचे गोकुळही प्रायोजक आहे. तसेच प्रदर्शनात गोकुळचा स्टॉल असणार आहे. यासंबंधी मार्केटिंग विभागाचे व्यवस्थापक हणमंत पाटील म्हणाले, ‘दर्जेदार व उच्च प्रतीचे दूध हे गोकुळचे वैशिष्ट्य आहे. यासोबतच गोकुळने ग्राहकांसाठी चविष्ठ अशी दुग्धजन्य पदार्थ बाजारात उपलब्ध केले आहेत. विविध दुग्धजन्य पदार्थ हे ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत. या साऱ्या दुग्धजन्य पदार्थांची माहिती व विक्रीचा स्टॉल प्रदर्शनात असेल.’
पशुसंवर्धन विभागाचे डॉ. प्रकाश साळुंखे म्हणाले, ‘गोकुळने वैरण बँक ही संकल्पना अंमलात आणली आहे.मुरघास, सुकाचाराची वैरण बँक तयार केली आहे. चिकातील मक्याचे उत्कृष्ट दर्जाचे सायलेज बेल आहे. तसेच जनावरांच्या आजारावरील उपचारासाठी सहा प्रकारची आयुर्वेदिक औषधे तयार केली आहेत. औषधी वनस्पती, मसाल्याचे पदार्थ वापरुन ही हर्बल प्रॉडक्ट तयार केले आहेत. प्रदर्शनस्थळी ही सारी उत्पादने उपलब्ध असतील.’ यावेळी गोकुळचे मार्केटिंग विभागाचे अधिकारी उपेंद्र चव्हाण उपस्थित होते.