हॉटेलमधील मेन्यूकार्डप्रमाणे दिव्यांग प्रमाणपत्रासाठी सीपीआरमध्ये दर, दोन्ही मंत्र्यांनी रॅकेट उद्धवस्त करावे – शिवसेना उपनेते संजय पवार
schedule28 Nov 25 person by visibility 19 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : थोरला दवाखाना, गरीबांचा दवाखाना अशी ओळख असलेव्लया छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयांमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारी टोळी तयार झाली आहे. काही अधिकारी, कर्मचारी व दलालांचे हे रॅकेट असून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. हॉटेलमधील मेन्यू कार्ड प्रमाणे बोगस दिव्यांग प्रमाणपत्रासाठी दर निश्चित केले आहेत. कान, हात, डोळे अशा विविध अवयवाच्या बोगस प्रमाणपत्रासाठी दर निश्चित केले आहेत. चाळीस हजार, ८० हजार, एक लाख, दोन लाख रुपये उकळून बोगस प्रमाणपत्रे दिली जात आहेत. वैद्यकीय क्षेत्रांशी निगडीत दोन्ही मंत्री कोल्हापूरचे आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हे रॅकेट उद्धवस्त करावे अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात सीपीआरमधील काही डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह जिल्हा परिषदेतील काही कर्मचारीही सहभागी आहेत. यातील दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी केली. पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र संबंधी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल सादर केला. तसेच अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश केला. सीपीआरमध्ये हृदयशस्त्रक्रिया न करताही बोगस डिस्चार्ज कार्ड दिल्याचे त्यांनी कागदपत्रांच्या आधारे मांडले. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी दहा शिक्षकांचे अहवाल पुन्हा तपासणीसाठी मुंबईला पाठविण्याचे कारण काय ? असा सवाल त्यांनी केला. बोगस प्रमाणपत्रातून सीपीआरमधील काही कर्मचाऱ्यांनी मोठी माया जमविली आहे. एका शिपायाने दोन जेसीबी घेतले आहेत. जिल्हा परिषदेतील काही कर्मचारीही या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. या साऱ्या प्रकरणाचा छडा लावून दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी पवार यांनी मागणी केली. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे पदाधिकारी अवधूत साळोखे, विराज पाटील, संतोष रेडेकर, संजय जाधव, मंजित माने आदी उपस्थित होते.