प्रा. डॉ. आनंद पाटील यांचा चार डिसेंबरला नागरी सत्कार, २१०० पानांच्या तीन खंडांचे प्रकाशन
schedule27 Nov 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार, लेखक- संशोधक व गोवा विद्यापीठातील इंग्रजीचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद बळवंत पाटील यांनी साहित्य सेवेत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सपत्नीक नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. मराठी भाषा चळवळ व राजकीय अभ्यासक डॉ. दीपक पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून तर भाषा तज्ज्ञ व पद्मश्री प्रा. डॉ. गणेश देवी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.अशी माहिती नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष व शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी (चार डिसेंबर २०२५ ) गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे नाट्यगृह येथे सायंकाळी पाच वाजता हा नागरी सत्कार सोहळयाचा कार्यक्रम होणार आहे.
माजी कुलगुरू साळुंखे म्हणाले, ‘प्रा. डॉ. आनंद पाटील हे आंतराष्ट्रीय ख्यातीचे तुलनाकार आहेत. संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी ६५ इंग्रजी व मराठी पुस्तकांचे लेखक आहेत. दरम्यान या नागरी सत्कार सोहळयात पाटील यांनी लिहिलेल्या आणि महाराष्ट्र राज्य साहित्य – संस्कृती मंडळाकडून निर्मिती करण्यात आलेल्या तीन खंडाचे प्रकाशन कण्यात येणार आहे. राज्य साहित्य आणि – संस्कृती मंडळाने जागतिकीकरणात सांस्कृतिक अभ्यासाचे वाढते महत्व लक्षात घेऊन सांस्कृतिक मीमांसा प्रकल्पाची जबाबदारी प्रा. पाटील यांच्यावर सोपवली होती. पाटील यांनी ‘सांस्कृतिक मीमांसा : समाज-संस्कृती आणि साहित्य’, ‘जगभराचे सांस्कृतिक सिद्धांत : उपयोजनांच्या नव्या दिशा’ आणि ‘सांस्कृतिक अभ्यास : जुने, नवे आणि भवितव्य’ असे २१०० पानांचे तीन खंड लिहिले आहेत. या तीन खंडांचे प्रकाशन मान्वयरांच्या हस्ते होणार आहे.
डॉ. बी. एम. हिर्डेकर म्हणाले, ‘प्रा. पाटील यांच्या लेखणीला मोठे साहित्यिक मूल्य आहे. त्यांच्याकडे प्रमाणबद्ध लिखाणाचा बाज आहे. त्यांचे तौलनिक अभ्यासात मोठे काम आहे. साहित्य व संस्कृती याविषयासंबंधी जागतिक पातळीवर लेखन करणारे मोजके विद्वान आहेत. त्यापैकी आपल्याकडे पाटील हे एक आहेत. त्यांना आजवर विविध संस्थांनी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. ते कोल्हापूरचे आहेत. त्यांचा करवीरनगरीत सत्कार घडावा यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम होत आहे.’ पत्रकार परिषदेला गौरव समितीचे सदस्य डॉ. बी पी. साबळे, सचिव प्रा. डॉ. मनिषा पाटील, डॉ. भालबा विभूते, प्राचार्य टी. एस. पाटील, डॉ. व्ही. व्ही. भोसले आदी उपस्थित होते.