प्राध्यापक निलंबित, प्रभारी प्राचार्यांवर अॅक्शन कधी ?
schedule28 Nov 25 person by visibility 5 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) पेपर फुटी प्रकरणी मिरज महाविद्यालयातील प्रा. अमोल जरगवर शिक्षण संस्थेने निलंबनाची कारवाई केली. याच गुन्हयात अटक झालेल्या राधानगरी तालुक्यातील सोळांकूर येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य गुरुनाथ गणपती चौगले, व बिद्री येथील ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक अभिजीत विष्णू पाटील, रोहित पांडूरंग सावंतसह अक्षय नामदेव कुंभार, नागेश दिलीप शेंडगे यांच्यावर काय कारवाई होणार ? याकडेही शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या पेपर फुटीत खासगी अॅकेडमीचेही काही शिक्षक सापडले आहेत. ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १९ जणांना अटक केली आहे. मुरगूड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संयुक्उत कारवाई केली. परीक्षेच्या अगोदरच पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी सात जणांना अटक केली. तर दुसऱ्या दिवशी कारवाई करताना आणखी ११ जणांना अटक केली आहे. यामध्ये कराड येथील बेलेवाडी येथील या रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाडला अटक झाली आहे. दरमयान पेपर फुटी प्रकरणात ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक, सिनीअर कॉलेजमधील प्राध्यापक व एका प्रभारी प्राचार्याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली. प्रा. जरग हे सरवडे येथील आहे. मिरज येथील कॉलेजमध्ये भूगोल विषयाचा प्राध्यापक आहे. संस्थेने, त्याच्यावर निलंबनाची कारवाई करत त्या संबंधीची माहिती शिक्षण सहसंचालक कार्यालय व शिवाजी विद्यापीठ प्रशासनाला कळविले आहे. शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून, संबंधित संस्थांना दोषी आढळलेल्या प्राध्यापकांवर काय कारवाई केली यासंबंधीची माहिती मागविली आहे. दोन दिवसापूर्वी, शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून त्यासंबंधीची पत्रे संस्थांना पाठविली आहेत. सोळांकूर येथील प्रभारी प्राचार्य चौगलेनाही या पेपर फुटी प्रकरणी अटक झाली आहे. याप्रकरणी संबंधित प्रभारी प्राचार्यांवर, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार कारवाई करावी असे शिक्षण सहसंचालकांनी संस्थेला कळविले आहे.